सुंदररमण राममूर्ती (Sundararaman Ramamurthy) हे बाँबे स्टॉक एक्सचेंजचे (BSE) नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) असतील. या नियुक्तीला सेबीची (SEBI) मान्यता मिळाल्याचं BSE ने आपल्या भागधारकांना कळवलं आहे.
‘सुंदररमण राममूर्ती यांनी 6 जानेवारीपासून BSE चा कार्यभार सांभाळायला सुरूवात केली आहे. त्यांच्याकडे व्यवस्थापकीय आणि कार्यकारी जबाबदारी असेल,’ असं एक्सचेंजने सेबीकडे फाईल केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
BSE चे आधीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी BSE चा राजीनामा दिल्यामुळे जुलै 2022 पासून हे पद रिक्त होतं. आशिषकुमार BSE सोडून NSE एक्सचेंजमध्ये रुजू झाले आहेत. तर राममूर्ती यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवातही NSE पासून केली आहे. ते NSE च्या स्थापनेपासून तिथले वरिष्ठ सदस्य होते.
कोण आहेत सुंदररमण राममूर्ती? Who is Sunderraman Ramamurthy?
59 वर्षीय सुंदररमण राममूर्ती हे NSE एक्सचेंजच्या स्थापनेपासून तिथं कार्यरत होते. आणि वीस वर्षं तिथे काम करताना त्यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. याशिवाय त्यांना बँकिंग क्षेत्राचाही तगडा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया तसंच इंडिया ओव्हरसीज् बँक या सरकारी बँकांमध्येही मोठ्या पदावर काम केलं आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते बँक ऑफ अमेरिकेच्या भारत प्रमुख पदावर कार्यरत होते. आणि तिथे बँकेच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये आवश्यक डिजिटिल, ऑनलाईन प्रणाली वापरण्याचं काम त्यांच्या देखभालीत पूर्ण झालं. बँकांच्या आधुनिकीकरणाकडे त्यांचा कल आहे. आणि त्यांना त्याचा अनुभवही आहे.