Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

Image Source : www.psuwatch.com

BOM dividend: एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं (BoM) बंपर असा डिव्हिडंड दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या डिव्हिडंडचा चेकदेखील नुकताच देण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वेगानं विस्तारणारी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे.

आर्थिक वर्ष 2022-23साठी बँक ऑफ महाराष्ट्रनं (Bank of Maharashtra) बंपर असा लाभांश मिळवला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना 795.94 कोटी रुपयांच्या लाभांशाचा हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, बँकेनं सरकारला दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश (Dividend) आहे, असं बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातच देशातल्या सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं (State Bank of India) सरकारला 5740 कोटी रुपयांचा धनादेश (Cheque) दिला होता.

प्रति शेअर दीड रुपये लाभांशाची घोषणा

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांच्यासह कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार आणि आशिष पांडे यांनी या रकमेचा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव समीर शुक्ला उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्रनं 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 1.30 रुपये लाभांश जाहीर केला होता.

एसबीआयनं दिला आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश चेक

2022-23 या आर्थिक वर्षासाठी, एसबीआयनं आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांशाचा चेक अर्थमंत्र्यांना दिला. एसबीआयकडून तब्बल 5740 कोटी रुपयांचा लाभांशाचा धनादेश नुकताच देण्यात आला होता. कोणत्याही आर्थिक वर्षातली ती सर्वाधिक लाभांश रक्कम आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना 1130 टक्के म्हणजेच प्रति शेअर 11.30 रुपये लाभांश दिला आहे. याची रेकॉर्ड डेट 31 मे 2023 होती.

एसबीआयची एकूण कामगिरी

सर्वाधिक रकमेचा डिव्हिडंड एसबीआयनं दिला होता. कारण 2022-23 या आर्थिक वर्षात एसबीआयनं विक्रमी कमाई केली होती. बँकेच्या निव्वळ नफ्यात प्रचंड वाढ झाली होती. 50,232 कोटी रुपयांवर हा नफा पोहोचला. ऑपरेटिंग प्रॉफिट 83,713 कोटी रुपये इतका होता. निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ झाल्याचं दिसून आलं. वार्षिक आधारावर ती 19.99 टक्के इतकी होती.

बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा वाढला

31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा दुपटीनं वाढून 840 कोटी रुपये झाला आहे. मागच्या वर्षाच्या कालावधीत तो 355 कोटी रुपये इतका होता. या कालावधीत बँकेचं एकूण उत्पन्न 5,317 कोटी रुपये होतं. मागच्या वर्षीच्या याच कालावधीत ते 3,949 कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष 2022-23च्या मार्चच्या तिमाहीच्या दरम्यान व्याजाचा उत्पन्न एका वर्षापूर्वी यात तिमाहीत 3,426 कोटी रुपयांवरून वाढून 4,495 कोटी रुपये झालं आहे.