शंकर मिश्रा (Shankar Misra) या वेल्स फार्गो बँकेच्या (Wells Fargo) भारतातल्या उपाध्यक्षाने अलीकडे न्यूयॉर्कहून मुंबईला (New York to Mumbai) येणाऱ्या विमानात मद्यधुंद अवस्थेत आपल्या सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. ही सहप्रवाशी 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक होती. एअर इंडियाच्या (Air India) न्यूयॉर्क ते मुंबई थेट विमानात हा घृणास्पद प्रकार घडला होता. तेव्हापासून या प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. एअर इंडियावरही हे प्रकरण नीट न हाताळल्याचा आरोप होतो आहे. आरोपी शंकर मिश्राला नुकतंच (7 जानेवारी) बंगळुरू इथून अटक करण्यात आली आहे. तर एअर इंडियानेही प्रकरण गाजल्यावर चारही वैमानिक तसंच केबिन क्रूला सध्या निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिश्रा काम करत असलेल्या वेल्स फार्गो बँकेनं प्रकरणाची चौकशी करून त्याला कामावरून काढून टाकत असल्याचं 6 जानेवारीला जाहीर केलं आहे.
‘वेल्स फार्गोमधून आम्ही शंकर मिश्राला काढून टाकलं आहे. तपास यंत्रणेलाही आम्ही सहकार्य करत आहोत. आमच्याकडच्या कर्मचाऱ्यांचं वागणं व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरही चांगलंच असावं असा आमचा दंडक आहे,’ असं वेल्स फार्गो बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
एअर इंडिया विमानात नेमकं काय घडलं?
26 नोव्हेंबरच्या रात्री एअर इंडियाच्या मुंबईला येणाऱ्या विमानात शंकर मिश्रा बिझिनेस क्लासमध्ये प्रवास करत होता. तो मद्यधुंद होते असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आणि ज्येष्ठ नागरिक महिलेबरोबर झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर त्याने तिथेच तिच्यावर लघुशंका केली.
पण, हे प्रकरण डिसेंबरमध्ये उघड झालं. आणि एअर इंडियाच्या कर्मचारी वर्गानेही झालेला प्रकार आणि मद्यधुंद असलेला प्रवासी नीट हाताळला नाही, असा आरोप विमान कंपनीवर झाला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही या प्रकरणी पोलीस तक्रा झालीच नाही. पण, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातून चर्चा सुरू झाल्यावर 4 जानेवारीला एअर इंडियाने याविषयी पहिली पोलीस तक्रार केली. नागरी उड्डयण मंत्रालयानेही प्रकरणाची दखल घेऊन एअर इंडियाला खडे बोल सुनावले होते.
ती महिला आणि शंकर मिश्रा यांच्यात नंतर वाटाघाटी झाल्यामुळे हे प्रकरण संपलं, असं आम्हाला वाटलं असं एअर इंडियाने 4 जानेवारीला केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. खुद्द शंकर मिश्रानेही आपल्या वकिलांमार्फत महिलेबरोबर झालेल्या वॉट्स अॅप संभाषणाच्या प्रती पोलिसांना सादर केल्या आहेत. ‘महिलेकडे माफी मागितली, तिचे कपडे आणि बॅग धुवून दिली आणि चुकीचा मोबदला दिला,’ असं शंकर मिश्राच्या वकिलांनी म्हटलं आहे. पैसे पेटीएमने दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पण, मूळात विमानात गैरवर्तणूक का फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे विमान कंपनीने याची दखल स्वत:हून घेतली पाहिजे होती, असं मीडिया आणि लोकांचं म्हणणं आहे. या वाढत्या दबावामुळे अखेर शंकर मिश्राविरुद्ध तक्रार दाखल झाली. आणि काही काळ फरार राहिल्यानंतर मिश्राला आता बंगळुरू पोलिसांनी अटक केलीय.
(बातमी अपडेट होत आहे)