MHADA Lottery मध्ये घर मिळवण्याची गिरणी कामगारांना संधी उपलब्ध झाली आहे. गिरणी कामगारांच्या घरांची जाहिरात निघाली आहे. यात किती घरे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत काय आहे, याविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
2521 घरांसाठी ही सोडत
गिरणी कामगारांना अनेक वर्षांपासून म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा होती. आता ही सोडत निघाल्याने या कामगारांना घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही MHADA Lottery ठाणे-रायगडमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील गृहप्रकल्पासाठी असणार आहे. 2521 घरांसाठी ही सोडत निघाली आहे.
यामुळे गिरणी कामगारांना (Mill Workers) हा दिलासा मानला जात आहे. या 2521 घरांसाठी 19 डिसेंबर ते 17 जानेवारीपर्यंत गिरणी कामगारांना अर्ज करता येणार आहे. सुमारे महिनाभर ही मुदत असणार आहे.
70 च्या दशकात कामगारांवर ओढवले होते आर्थिक संकट
गिरणी कामगारांच्या संपाचा जुना इतिहास आहे. 70 च्या दशकातील अखेरच्या कालावधीत गिरणी कामागारांनी संप केला होता. मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. 1978 ते 1980 च्या कालावधीतल्या या घटना आहेत. गिरणी कामगारांच्या रोजगारावरचे हे मोठे संकट होते. त्यांचा रोजगार बंद झाला होता. यामुळे जीवन चालवणे गिरणी कामगारांसाठी अवघड बनले होते. किमान गरजाही पूर्ण करणे कठीण होऊन बसले. अनेकांनी वेगळा व्यवसाय किवा नोकरी करण्याचा प्रयत्नही करून बघितला. मात्र तरीही अनेक कामगार या आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकले नाहीत. या कामगारांसाठी काहीतरी केले पाहिजे अशा भूमिकेतून MHADA कडून त्यांना घरे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. यांनंतर काही कामगारांना घरे दिली आहेत. मात्र काही गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना घराची अजूनही प्रतीक्षा आहे.
बहुतांश घरं 320 चौ. फुट
आता म्हाडाकडून ही सोडत निघाली आहे. ही घरे ठाणे आणि रायगड परिसरातील आहेत. यामध्ये
ठाणे जिल्ह्यातील रांजनोळीमध्ये टाटा हाऊसिंग कंपनीने 1244, रायगड जिल्ह्यात रायचुरमध्ये विनय अगरवाल शिलोटर यांनी बांधलेली 1019 इतकी तर याचप्रमाणे सॅनव्हो व्हिलेज लि. ने कोल्हेमध्ये बांधलेली 258 घरं आता गिरणी कामगारांसाठी उपलब्ध झाली आहेत. यातील बहुतांश सदनिका या 320 चौ. फुटांच्या आहेत.
एकूण पावणे 2 लाख अर्ज प्राप्त
MHADA lottery साठी गिरणी कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 1 लाख 75 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. बऱ्याच जणांनी एकापेक्षा अधिक अर्ज केल्याने ही संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारणाने प्रारुप यादीतील 12 हजार 981 अर्जदारांची यादी वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे. यात ज्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत त्यांनी म्हाडाकडे अर्ज करायचा आहे. कोणता एक अर्ज ग्राह्य धरायचा याविषयीचा विनंती अर्ज कामगारांना करावा लागणार आहे. यासाठी १९ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.