राज्यातील जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे. याचा फायदा अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना झालेला आहे. परंतु आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना काही ना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सहाव्या वेतन आयोगात ज्यांच्या त्रुटी राहिल्या होत्या त्यांना बक्षी समितीच्या शिफारशीनुसार घेतले जाणारे नियम बंधनकारक असणार आहेत, म्हणजेच त्यांना जुनी थकबाकी मिळणार नाहीये.
शासकीय, जिल्हा परिषदा,नगर पालिका कर्मचाऱ्यांना व इतर पात्र तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जुन 2021 मध्ये अदा करण्यात आलेला होता.परंतु अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत निधी अभावी सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यात आलेले नव्हते. सरकारी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत सरकारकडे विनंती-अर्ज केले होते. उद्या केंद्र सरकार संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. त्यात सातव्या वेतन आयोगाबाबत काय घोषणा होतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोबतच राज्य सरकारचा अर्थसंकल्प काही दिवसांनी जाहीर होणार आहे. त्याआधी सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते दिले जावेत अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत.
देयके सादर करण्याचे आवाहन
ज्या शासकीय कार्यालयांनी सेवानिवृत्त/ मयत / दुबार कर्मचारी शाळा/दुबार ऑफलाईन वेतन घेणारे कर्मचारी यांचा सातवा वेतन आयोग पहिला/दुसरा/तिसरा हप्ता ऑफलाईन देयक तयार करून अद्याप सादर करण्यात आलेले नाही अशा कार्यालयांनी लवकरात लवक आपले देयक सादर करावे असे निवेदन संबंधित कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच माहे जुलै 2021 पासून वेळोवेळी वाढलेले महागाई भत्ता फरक सेवानिवृत्त कर्मचारी यांचे देयक तात्काळ ऑफलाईन सादर करावे, असेही म्हटले गेले आहे.
याबाबत महामनीशी बोलताना राधिका महांकाळ (कर्मचारी संघटना प्रतिनिधी) यांनी सांगितले की सातव्या वेतन आयोगासाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत आपली देयके वित्त विभागाकडे सादर करणे अपेक्षित होते, परंतु अजूनही बऱ्याच कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर केलेली नाहीत.देयके सादर करण्याची मुदत वाढणे अपेक्षित आहे.परंतु वित्त विभागाने त्यावर विचार न केल्यास संबंधित कर्मचारी लाभापासून वंचित राहू शकतो, तेव्हा लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी आपली देयके सादर करायला हवीत.
सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याच्या देयकाबाबत सूचना
सदर देयके दिनांक 8 जानेवारी 2023 ते 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने या कार्यालयास सादर करावी सेवानिवृत्त झालेल्या व माहिती फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत निवृत्त होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे देयक ऑफलाइन पद्धतीने स्वतंत्रपणे सादर करावीत असे म्हटले होते. परंतु देयके स्वीकारण्याचा कालावधी वाढवण्यात आला होता.
- पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचे देयके अद्याप अप्राप्त आहेत अशा कर्मचाऱ्यांचे मागील देयकाच्या झेरॉक्स प्रति सोबत जोडून सादर करावे.
- देयकासोबत लेखाधिकारी शिक्षण विभाग यांनी सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन निश्चिती केलेल्या आयोगाच्या सत्यप्रती व फरक तक्ते सादर करावेत असे म्हटले आहे.
- मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र देयकासोबत सादर करावे असे म्हटले आहे. मयत कर्मचाऱ्यांचे पाचही हप्त्यांचे एकत्रित देयक सादर करावे (यापूर्वी सातवा वेतन आयोगाचा हप्ता अदा केला असल्यास तो हप्ता वगळून)
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावासमोर सेवानिवृत्ती दिनांक नमूद करून कार्यमुक्ती आदेशाची प्रत सोबत जोडावी, असे निर्देश दिले गेले आहेत.
- कोणत्याही कर्मचाऱ्यास जादा रक्कम अदा होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी (मुख्याध्यापक/पर्यवेक्षक/वित्त अधिकारी) दक्षता घ्यावी असे म्हटले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या आर्थिक लाभापासून अजूनही अनेक कर्मचारी वंचित आहेत. त्यांनी लवकरात लवकर देयके सादर करणे आवश्यक आहे. येत्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगाबद्दल देखील घोषणा केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मागील सर्व प्रकरणे निकालात निघाली तर कर्मचाऱ्यांचा त्रास वाचणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.