• 06 Jun, 2023 17:58

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 5000 विशेष एसटी सोडणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Special 5000 ST Bus for Ashadhi Ekadashi 2023

Image Source : www.livemint.com

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपति संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 6 विभागातून 5000 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने 5 हजार विशेष एसटी बस सोडणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्याच्या विविध भागातून 25 जून ते 5 जुलै या कालावधीत या विशेष एसटी बस धावणार आहेत. त्याचबरोबर 27 जून रोजी वाखरी येथे होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी अतिरिक्त 200 एसटी बस सोडल्या जाणार आहेत.

पंढरपूरच्या आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने येतात. बरेच वारकरी पायी चालत दिंडीसोबत येतात. पण काही वारकरी मात्र एसटीने किंवा मिळेल वाहनाने पंढरपूरची वाट धरत असतात. अशा या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 15 मे) सह्याद्री अतिथीगृहात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत  मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला राज्याच्या विविध भागातून पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 5000 विशेष एसटी सोडण्याचा निर्णय घेतला.

6 विभागातून एसटी बस सोडणार!

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने याने पूर्व नियोजन केले असून, आषाढी एकादशीनिमित्त मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपति संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 6 विभागातून विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपति संभाजीनगर विभागातून 1200, नाशिक विभागातून 1000, पुण्यातून 1200, अमरावतीमधून 700, नागपूरमधून 100 आणि मुंबई विभागातून 500 एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

पंढरपुरात 4 तात्पुरती स्थानके उभारणार

पंढरपुरात यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने, बाहेरून येणाऱ्या भाविकांची एकाच बस स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी पंढरपुरात 4 तात्पुरती बस स्थानके उभारली जाणार आहेत. ही तात्पुरती बस स्थानके चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना याठिकाणी असणार आहेत. तात्पुरत्या स्थानकांबरोबर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, तिकिट आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आदी सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. 

आवडेल तिथे प्रवास योजनेचा घेता येईल लाभ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ 'आवडेल तिथे कोठेही प्रवास' ही योजना राज्यातील प्रवाशांसाठी राबवली जात आहे. या योजनेंतर्गत एसटी महामंडळातर्फे 4 आणि 7 दिवसांचे पास दिले जातात. या पास अंतर्गत प्रवाशी साधी एसटी बस यामध्ये जलद, रात्रसेवा, शहरी, यशवंती या प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. याचे 7 दिवसांसाठी प्रोढ व्यक्तीच्या पासाची किंमत 2040 रुपये तर 4 दिवसांच्या प्रोढ व्यक्तींच्या पासाची किंमत 1170 रुपये आहे. यामध्ये मुलांच्या पासाची किंमत अनुक्रमे 1025 आणि 585 रुपये इतकी आहे. एकादशीच्या यात्रेनिमित्त वारकरी या योजनेचा लाभ घेऊन आपला प्रवास सुखमय करू शकतात. 

राज्यातील नागरिकांना स्वस्तात मस्त प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र् राज्य परिवहन सेवा मंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये एकाच मार्गावर नोकरी करणारे, व्यवसायानिमित्त सातत्याने प्रवास करणारे तसेच सुट्ट्यांमध्ये पर्यटन किंवा धार्मिक यात्रेनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सवलत मिळवून देणाऱ्या योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ ही वारकरी घेऊ शकतात.