Mumbai Metro: मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 2014 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्यावहिल्या या मार्गिकेला मुंबईकरांनीही उत्तम प्रतिसाद दिला. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्या असून मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या(MMOPL) मेट्रो 1 मार्गिकेलाही याचा फायदा झाला आहे. मेट्रो 1च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोनानंतर पहिल्यांदाच ‘मेट्रो 1(Metro 1)’ची दैनंदिन प्रवासी संख्या 4 लाखांवर पोहचली आहे.
कोरोनापूर्वी प्रवासी संख्या किती होती?
मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका म्हणून ओळखली जाणारी घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो 2014 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्यावहिल्या या मार्गिकेला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे काही वर्षातच या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढत गेली. टाळेबंदी लागेपर्यंत दिवसाला 4.5 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते. टाळेबंदीच्या काळात आठ महिने ‘मेट्रो 1 बंद होती. आठ महिन्यांनंतर ‘मेट्रो 1’ सेवा पुन्हा सुरू झाली मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे आणि 50 टक्के प्रवासी क्षमतेमुळे दैनंदिन प्रवासी संख्या हजारांवर आली. कालांतराने ही परिस्थिती निवळली आणि आता परत एकदा ‘मेट्रो 1’ वर प्रवासी संख्या वाढली आहे. आतापर्यंत ‘मेट्रो 1’ची दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 3.85 लाखाच्या आसपास होती. मात्र, मंगळवारी, 24 जानेवारी रोजी प्रवाशी संख्या थेट चार लाखांवर पोहोचल्याची माहिती एमएमओपीएलच्या(MMOPL) प्रवक्त्यांनी दिली आहे.
कोणत्या स्थानकावर संख्या वाढली आणि का?
विशेष म्हणजे मागील आठवड्याच्या तुलनेत प्रवासी संख्या 15000 ने वाढली आहे. ही वाढ प्रामुख्याने डी. एन. नगर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकावरील प्रवासी संख्येत झाल्याचे निदर्शनास आले आहे. या स्थानकांवरील प्रवासी संख्येत अनुक्रमे 8000 आणि 6000 ने वाढली आहे. ‘मेट्रो 2A’वरील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक, ‘मेट्रो 1’वरील डी. एन. नगर स्थानकाशी जोडले आहे. त्यामुळे दहिसरच्या दिशेने येणाऱ्या मेट्रो प्रवाशांना वर्सोवा आणि घाटकोपरला जाणे अधिक सोपे झाले आहे. तर ‘मेट्रो 7’वरील गुंदवली स्थानक ‘मेट्रो 1’वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानकाशी जोडले असल्याने दहिसर पूर्व येथून ‘मेट्रो 7’ने येणाऱ्यांना गुंदवलीला उतरून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वर्सोवा आणि घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी मदत होत आहे. मेट्रो 2A आणि 7 मुळे मेट्रो 1 ची प्रवासी संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.