झी मीडिया समुहाने (Zee Media) अलीकडेच सोनी समुहाकडून (Sony Network) टेन स्पोर्ट्सच्या सर्व वाहिन्या ताब्यात घेतल्या होत्या. आणि आता झी समुह तयारी करत आहे ती स्पोर्ट्स प्रक्षेपणात (Live Sports) पुनरागमनाची. झी स्पोर्ट्स या वाहिनीचं रिलाँचिंग होणार आहे. त्यासाठी कंपनीने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाबरोबर (Emirate's Cricket Board) दहा वर्षांचा करार केला आहे.
आणि हे क्रिकेट मंडळ आयोजित करत असलेली इंटरनॅशनल क्रिकेट लीग स्पर्धा झी स्पोर्ट्सवर लाईव्ह दाखवली जाणार आहे . ही आयपीएलच्या धर्तीवर होणारी आंतरराष्ट्रीय टी-20 लीग असणार आहे. विरेंद्र सेहवाग या स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर असणार आहे. त्याच्यावर चित्रित झालेला स्पर्धेचा प्रोमोही अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सोनी वाहिनीकडे सध्या WWE, फिफाच्या फुटबॉल स्पर्धा, युरोकप ही फुटबॉल स्पर्धा, क्रिकेटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा तसंच इंग्लंडचा भारत दौरा अशा स्पर्धांच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत. सोनीची स्पोर्ट्स वाहिनी झीमध्ये विलीन झाल्यामुळे झी स्पोर्ट्सला हे हक्कं आता मिळतील.
झी स्पोर्ट्सची स्पर्धा डिस्ने हॉटस्टारशी Competition Between Zee Sports & Disney Hotstar
आतापर्यंत स्पोर्ट्स प्रक्षेपण क्षेत्रात सोनी आणि डिस्ने स्टार कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. आतापर्यंतची आकडेवारी बघितली तर सोनी वाहिनीला 2019 साली स्पोर्ट्स प्रक्षेपणा दरम्यानच्या जाहिरातीतून साधारणपणे 800 ते 900 कोटी रुपयांची कमाई झाली. तर डिस्ने स्टारला फक्त आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणातून 2100 कोटी रुपये मिळाले.
आताही झी आणि सोनी या कंपन्या एकत्र आल्यावर स्पर्धा आणखी वाढणार आहे. सोनी कंपनीकडून स्पोर्ट्स प्रसारणासाठी झी समुहाला 1.6 अब्ज अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. आणि या गुंतवणुकीतून झी स्पोर्ट्सला डिजिटल सेवा देण्यासाठी मदत मिळेल , असा झी कंपनीचा होरा आहे.
कोव्हिड नंतरच्या काळात स्पोर्ट्स क्षेत्रात मीडिया राईट्स आणि जाहिरातींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच आयपीएल स्पर्धेची उलाढालही 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेली. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पोर्ट्स प्रक्षेपण हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण, आयपीएल सह इतर अनेक महत्त्वाच्या स्पर्धांच्या प्रसारणाचे हक्क येत्या दिवसांमध्ये पुन्हा नव्याने वितरित होतील.