फिफा वर्ल्ड कप (FIFA Football Worls Cup 2022), क्रिकेट टी२० वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2022) अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू असतानाही देशाच्या मातीतला खेळ असलेल्या कबड्डीने मागच्या दोन महिन्यात टीव्हीवरील प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. स्टार स्पोर्ट्सची निर्मिती असलेल्या प्रो कबड्डी लीगने (Pro Kabaddi League) नवव्या हंगामात 20 कोटी प्रेक्षक मिळवले. विशेष म्हणजे यातले 29% प्रेक्षक पहिल्यांदाच प्रो कबड्डीचा सामना पाहात होते. यंदा डिसेंबर महिन्यात लीगचे 114 सामने झालेले असताना गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रेक्षक संख्या 8%नी जास्त आहे.
भारतातील कबड्डी अर्थव्यवस्था Kabaddi Economy in India
सध्या प्रो कबड्डी लीग ही आयपीएल नंतरची भारतातली सगळ्यात मोठी लीग समजली जाते. आकार आणि त्यात होणारी आर्थिक उलाढाल हे त्यासाठीचे निकष आहेत. आर्थिक उलाढाल म्हणाल, तर या लीगमुळे कबड्डी संघटना, आजी-मजी कबड्डीपटू तसंच विविध संघांचे मालक, सपोर्ट स्टाफ अशा सगळ्यांना आर्थिक मदत झाली.
पहिल्या हंगामात, सर्वाधिक बोली लागलेल्या कबड्डीपटूला 12 लाख रुपये मिळाले होते. आता तोच आकडा 2.5 कोटींवर गेला आहे. खेळाच्या पाचव्या हंगामापासून स्पर्धेला टायटल स्पॉन्सर मिळाला. विवो, जीएमआर, कोटक बँक यासारख्या मोठ्या कंपन्यांनी कबड्डी लीगच्या प्रायोजकत्वासाठी उत्सुकता दाखवली आहे.
एखाद्या सामन्यासाठी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद हा टाईम स्पेंट निकषाअंतर्गत मोजला जातो. म्हणजे एका प्रेक्षकाने एखादी मॅच सुरू केल्यावर ती किती काळ सलग पाहिली याचा आढावा घेतला जातो. क्रिकेट किंवा इतर कुठल्याही खेळाच्या तुलनेत कबड्डीला मिळणारा टाईम स्पेंट सगळ्यात जास्त आहे. आणि देशात सगळीकडे, सर्व क्षेत्रात हा वेळ सारखाच म्हणजे जवळ जवळ 55% च्या आसपास आहे.
प्रो कबड्डीची लोकप्रियता का वाढली? Why Pro Kabaddi is Popular?
कबड्डी या खेळात अॅक्शन पहिल्यापासून होती. अगदी गाव पातळीवर होणाऱ्या सामन्यांसाठीही लोकांची चांगली गर्दी होत होती. पण, या प्रेक्षकांना टीव्हीवरही आणण्यात ही लीग यशस्वी ठरली. भारतीय खेळ म्हणून कबड्डीचा झालेला प्रचार आणि खेळात व्यावसायिकता आणल्यामुळे भारताबाहेरही हे सामने पाहिले जात आहेत.
शिवाय कबड्डीचे जगभरातले चाहते टीव्ही, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष मैदानात एकत्र आणण्याचं काम प्रो कबड्डी लीगने केलं. आणि त्यामुळे लीगची लोकप्रियता वाढली. मैदानावर जाऊ शकणार नसाल तर सोशल मीडिया किंवा टीव्हीवरही तुम्ही खेळाची कनेक्टेड राहू शकता ही कल्पना लोकांसाठी सुखावणाही ठरली.
हा मुद्दा लीगच्या यशस्वितेत मोठा हातभार लावतो. कारण, कबड्डी बरोबरच कुस्ती, खोखो अशा इतरही खेळांच्या लीग नंतर भारतात आल्या. पण, त्यांना अजून तरी कबड्डी सारखा प्रितिसाद मिळालेला नाही.
आणखी एक कारण म्हणजे कबड्डीपटू म्हणून तुमची कारकीर्द घडू शकते हे पालकांना कळल्यावर घराघरांमधून कबड्डीला होणारा विरोधही कमी झाला आहे. याचा उपयोग खेळाची लोकप्रियता वाढण्यासाठी होऊन लीगचा प्रेक्षक वर्ग वाढला.
आणि या सगळ्याचा फायदा अर्थातच लीगमधून महसूल मिळवण्याच्या बाबतीत लीगच्या मालकांना झाला.