Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तरुणांनो आयुष्यात करा हे छोटेसे बदल, वाचतील खूप सारे पैसे

तरुणांनो आयुष्यात करा हे छोटेसे बदल, वाचतील खूप सारे पैसे

Image Source : www.homeworkhelpglobal.com

शालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

शालेय आणि महाविद्यालयीन जीवन यात जमीन आस्मानाचा फरक असतो, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मुलांनी कोणत्या शाळेत जायचे, हे पालक ठरवतात. त्यांच्या देखरेखीखाली मुले आनंदाने शाळेत जातात. पण जस जशी मुले मोठी होतात. त्याचे भावविश्व बदलते. शाळेतील मित्रमैत्रीण बदलतात. त्यांच्या जागी नवीन मित्र भेटतात; आणि एक वेगळे आयुष्य सुरू होते. कॉलेज म्हटले की, मित्रमैत्रिणींसोबत कॅम्पसमध्ये फिरणे, कॅन्टिनमध्ये खाणे, चित्रपटाला जाणे या सगळ्याच गोष्टी ओघाने येतात. शालेय जीवनात मुले जितका खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने कॉलेजमध्ये गेल्यावर मुले खर्च करायला लागतात. त्यावेळी त्यांना आपण अनावश्यक खर्च करत आहोत, हे लक्षात देखील येत नाही. यात बऱ्याच वेळा मित्रमैत्रिणांचा आग्रह आणि दुसऱ्यांना काय वाटेल याचाच विचार असतो. स्वत:ला कितीही चांगल्या सवयी असल्या तरी काही वेळेस मित्रांच्या आग्रहामुळे त्या मोडल्या जातात. असे सतत केल्याने मग त्या मुलांनाही तशीच सवय लागते.

पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकणारी रसिका नाईक अशाच तिच्या अनुभवाविषयी सांगते की, “मी माझ्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे. माझे वजन थोडे देखील वाढले तर मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी बाहेरचे खाणे टाळते आणि त्यात जंक फुडपासून तर मी दूरच राहाते. पण कॉलेजमधील माझ्या मित्रमैत्रिणी अनेकवेळा जंक फुड खाण्यासाठी जातात. त्यांच्यासोबत जाण्यासाठी मी सतत नकार दिला तर चांगले वाटत नाही. त्यामुळे मी देखील आता त्यांच्यासोबत आठवड्यातून एकदा तरी हॉटेलमध्ये जाते. यामुळे माझ्या फिटनेसवर तर परिणाम होतो. पण त्याचसोबत माझे खूप सारे पैसे देखील खर्च होतात. पूर्वी मला मिळणाऱ्या पॉकेट मनीमधून मी दर महिन्याला पैशांची बचत करायची . पण आता माझे पैसे शिल्लकच राहात नाही. उलट आईकडूनच मला पैसे उसने घ्यावे लागतात.”

केवळ रसिकाच नाही तर मुंबईत राहणाऱ्या आशिष निकमचीही हीच समस्या आहे. तो सांगतो की, मला दर महिन्याला माझे आई-वडील ठराविक पैसे देतात. या पैशांमध्ये मला संपूर्ण महिन्याचा खर्च भागवायचा असतो. पण केवळ मित्रमैत्रिणींसोबत सतत राहायला मिळावे यासाठी मी अनेकवेळा कारण नसताना प्रचंड खर्च करतो. माझे मित्रमैत्रीण सतत कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये खायला जात असतात. सुरुवातीला मी त्यांना काही ना काही कारणं देत होतो. पण मी कारण देत असल्याचे आता त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो.

आपल्याकडे पैसे नसले तरी केवळ मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून अनेकजण फिरायला जातात आणि अनावश्यक खर्च करतात. माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी येऊ शकत नाही असे आपल्या मित्रमैत्रिणींना कसे सांगायचे हेच आजच्या तरुणांना कळत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आपण स्वत:हून काय काय करू शकता याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत .

स्पष्टपणे बोला आणि पर्यायांचा वापर करा 
आपले मित्रमैत्रीण कोणत्याही गोष्टीवरून आपल्याला जज करत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीयेत हे त्यांना सांगायला लाजू नका. तसेच ते एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन करत असतील तर त्याऐवजी तुम्ही त्यांना एखाद्या स्वस्त पण चांगल्या हॉटेलचा पर्याय सुचवू शकता. तो पर्याय तुमच्या मित्रांना नक्कीच आवडू शकेल.

जेवण्याऐवजी स्नॅक्स पार्टी करा
तुमचे मित्रमैत्रीण हॉटेलमध्ये जेवायला जायचा विचार करत असतील तर तुम्ही त्यांना जेवणाऐवजी फक्त स्नॅक्स खायला भेटू, असे सुचवू शकता. यातून तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल आणि तुमचे पैसे देखील वाचतील.

मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे टाळा
मल्टिप्लेक्समधील कोणत्याही चित्रपटाचे तिकीट हे 100 रुपयांपेक्षा जास्त असते. तसेच चित्रपटाच्या मध्यांतरात खाण्याचा, पिण्याचा खर्च होतो तो वेगळा. त्यामुळे चित्रपट पाहायला गेल्यानंतर तुमचे 300 ते 400 रूपये सहज खर्च होतात. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याऐवजी इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यावर मित्रांसोबत घरीच चित्रपट पाहा. तसेच चित्रपटांऐवजी पुस्तकांच्या, चित्रांच्या प्रदर्शनाला. यामुळे तुम्ही महिन्याला किमान पैशांची बचत करू शकता.

हॉटेलऐवजी कॅन्टिनमध्ये खा
अनेक कॉलेज कॅन्टिनमध्ये मिळणाऱ्या पदार्थाच्या किमती या बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थाच्या किमतीपेक्षा कमी असतात. त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर खाण्याचा बेत असेल तर तुम्ही कॅन्टिनमध्ये जाऊन खाऊ शकता. तसेच मित्रांना पार्टी द्यायची असल्यास ती हॉटेलपेक्षा कॉलेज कॅन्टिनमध्ये द्यायचा नक्कीच विचार करू शकता.
मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा म्हणजे पैसे खर्च करावेच लागतात, असे अनेकांना वाटते. पण तुम्ही मित्रांसोबत एकत्र क्लासला एकत्र जाऊ शकता. सुट्टीत डान्सचा, पोहण्याचा एकत्र क्लास लावू शकता. उन्हाळी शिबिरांना जाऊ शकता. यामुळे तुम्ही दिवसभरातील अनेक तास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.

गरजा आणि खर्च यांचा ताळमेळ
आजकाल तरुणांना ब्रँडेड वस्तू लागतात. यासाठी ते भरपूर पैसा खर्च करतात. आपल्या गरजा कोणत्या आहेत आणि आपण किती खर्च करत आहोत याचा ताळमेळ त्यांना घालता येत नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खर्च होतो. असा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी किती पैसे खर्च करायचे आहेत याची यादी बनवणे गरजेचे आहे . सगळ्या आवश्यक गोष्टी खरेदी केल्यानंतरही पैसे उरले तरच शॉपिंग करायचा विचार करा. तसेच दिवसभराचा प्रवासाचा खर्च, पुस्तकांसाठी लागणारे पैसे, मोबाईलचे बिल यासाठी लागणारे पैसे सर्वप्रथम बाजूला काढून ठेवा. तसेच नवीन गोष्ट खरेदी करायची असल्यास त्या गोष्टीची आता गरज आहे का हे स्वतःला विचारून घ्या.

पार्ट टाईम जॉब करा
कॉलेजमध्ये दिवसातील काही तास शिकण्यासाठी दिल्यानंतर उरलेला वेळ असाच फिरण्यात वाया घालवण्यापेक्षा पार्ट टाईम जॉबचा विचार करा. यामुळे तुम्हाला कुटुंबियांकडून पॉकेट मनी घ्यावा लागणार नाही. तुमचा दैनंदिन खर्च तुम्ही स्वत: भागवू शकता. स्वत: पैसे कमवायला शिकल्यावर त्याची किंमत कळते आणि आनावश्यक खर्च टाळला जाण्यास मदत होते.

लहान खर्चांचा विचार करा
अनेकवेळा आपण बाहेर जाताना पाण्याची बाटली किंवा खाण्यासाठी छोट्या वस्तू सोबत घेऊन जायला विसरतो. त्यामुळे आपल्याला विनाकारण त्यावर पैसे खर्च करावे लागतात. रिक्षाऐवजी बस वापर किंवा बसऐवजी पायी चालत जाणे असे लहान लहान खर्च सहज थांबवता येतात. एटीएममधून महिन्याभरात ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर दंड भरावा लागतो. तो टाळण्यासाठी महिन्यातून एकदाच पैसे काढण्याची सवय लावून घ्या. त्यातून महिन्याभराच खर्च करण्याची कसरत बरेच काही शिकवून जाते.

असेल लहान लहान खर्च आटोक्यात आणले तर तुम्ही सहज मोठी रक्कम बचत करू शकता. या बचत केलेल्या पैशांमधून तुम्ही तुमच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करू शकता. यासाठी पालकांकडे पैसे मागण्याची गरज पडणार नाही.