आपल्याला महिन्याभरात जितके पैसे मिळतात , तितके पैसे खर्च करून आपण आपले आयुष्य खूप चांगल्याप्रकारे जगू शकतो. त्यामुळे पैसे वाचवण्याचा हट्ट का करायचा असे काही जणांना वाटते. पण तुम्ही कमावलेल्या पैशातील काही पैसे वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने आयुष्यात बचत ही केलीच पाहिजे. बचत किंवा सेव्हिंग्ज करणे का आवश्यक आहे ? याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दुसऱ्यांवर अवलंबून राहाण्याची गरज नाही
तुम्ही बचत केली असेल तर एक चांगली रक्कम तुमच्याकडे जमा झालेली असते. त्यामुळे तुम्हाला पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. तुम्ही तुमच्या गरजा तुमच्या पैशातूनच भागवू शकता. तसेच एखादी गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे. कुठे फिरायला जायचे आहे, तर तुम्हाला कोणाकडे पैसे मागावे लागणार नाहीत.
घराचे स्वप्न पूर्ण करू शकता
आपले एखाद्या चांगल्या कॉम्प्लेक्स / सोसायटीमध्ये मोठे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण सध्या घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या असल्याने अनेकांना घर घेणे परवडत नाही. पण तुम्ही बचत केल्यास तुम्हाला पाहिजे तसे घर तुम्ही विकत घेऊ शकता. घर घेण्यासाठी अनेक बँका कमी व्याज दराने कर्ज द्यायला तयार असतात. पण सुरुवातीचे काही पैसे हे तुम्हालाच भरावे लागतात. त्यामुळे तुम्ही बचत करून प्रशस्त घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
स्वत : ची कार
रेल्वे , बस , रिक्षा , टॅक्सीने प्रवास करण्यापेक्षा आपल्याकडे देखील गाडी असावी असे सगळ्यांना वाटत असते. पण महागाईच्या काळात गाडी घेणे शक्य होत नाही. पण तुम्ही दर महिन्याला काही पैसे बाजूला ठेवून तुमच्या गाडीसाठी पैसे जमवू शकता आणि कमी पडणारी रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून घेऊ शकता.
कर्जमुक्त होण्यासाठी
आपल्या डोक्यावर कोणतेही कर्ज नसावे. आपण कर्जमुक्त आयुष्य जगावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपल्याला कर्ज हे काढावे लागते. आजच्या काळात घर, कार, खाजगी कर्ज , व्यवसायासाठी घेतलेले कर्ज , शिक्षणासाठी घेतलेले कर्ज अशा अनेक कर्जांच्या ओझ्याखाली लोक जगत असतात. त्यामुळेच दर महिन्याला आपण पैशांची बचत केली तर आपण यातील काही कर्ज तरी कालावधीच्या आत फेडू शकतो आणि टेन्शन फ्री आयुष्य जगू शकतो.
फिरायला जाण्यासाठी
सतत काम करून आपल्याला कंटाळा येतो. यामुळे अनेकवेळा आपली चिडचिड देखील होते. त्यामुळे आपला थोडासा तरी ताण दूर व्हावा. यासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा परदेशी फिरायला जाण्याचा प्लॅन सगळेच आखत असतात. पण कधीकधी पैशांच्या कमतरतेमुळे कुठेही जाता येत नाही. पण तुम्ही पैशांची बचत करून वर्षातून एकदा तरी एखाद्या चांगल्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.
संकटकाळातील नियोजनासाठी
आयुष्यात एखादे आर्थिक संकट आपल्यावर कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. तुमच्या घरात कोणी आजारी पडले , तुमची नोकरी गेली तर तुमच्याकडे एक चांगली रक्कम असली पाहिजे. खरे तर आयुष्यात प्रत्येक संकटासाठी आपण तयार असलो पाहिजे. संकटात कोणाकडेही हात पसरायला लागू नयेत, म्हणून बचत करणे गरजेचे आहे.
घराची डागडुजी
घरात कधी कोणता अनपेक्षित खर्च करावा लागेल हे आपण सांगू शकत नाही. एखादा पंखा किंवा लाईट बंद झाल्यास , घराची दुरूस्ती करायची झाल्यास, नळ दुरुस्त करायचा असल्यास , बेसिन तुंबल्यास तो दुरूस्त करून घेण्यासाठी आपल्याला खर्च हा करावाच लागतो. या सगळ्या गोष्टींसाठी काही पैसे बाजूला ठेवणे गरजेचे आहे.