तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात थोडेसे बदल केले तर तुमचे खूप सारे पैसे वाचू शकतात. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. केवळ आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी बदलल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मालामाल व्हाल.
चहा-कॉफीची सवय
अनेकांना दिवसभरात खूप वेळा चहा-कॉफी पिण्याची सवय असते. दिवसातील एखादी चहा-कॉफी तुम्ही घरी पिता... पण कामाच्या निमित्ताने तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा चहा-कॉफीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. काही जण तर दिवसाला सात-आठ कप चहा-कॉफी देखील पितात. साध्या टपरीवर देखील चहा-कॉफीसाठी तुम्हाला 10 ते 15 रुपये मोजावे लागतात. तुम्ही दिवसातील चहा-कॉफीचे प्रमाण कमी केले तर तुम्ही चांगले पैसे वाचवू शकता.
केवळ या गोष्टींसाठी वापरा क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड स्वॅप केल्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळतो आणि त्यामुळे अनेकजण डेबिट कार्ड अथवा कॅशचा वापर न करता क्रेडिट कार्डचा वापर करतात. पण शॉपिंग अथवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू नये. यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च करत असल्याचे तुमच्या लक्षात येत नाही. पण काही गोष्टींसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड नक्कीच वापरू शकता. कारण क्रेडिट कार्डवर पॉईंटस मिळतात अथवा कॅशबॅक मिळतो. त्यामुळे विजेचे बिल , मोबाईलचे बिल व इतर नियमित बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करा.
दोन महिन्यातून एकदाच करा शॉपिंग
तुम्ही घरातील सामान घेण्यासाठी मॉलमध्ये गेल्यानंतर अनेकवेळा नकळतपणे नेहमीच्या सामानासोबत गरज नसलेल्या अनेक वस्तू विकत घेता. त्यामुळे कधीही शॉपिंगला जाताना कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, याची यादी बनवा. त्यामुळे तुम्हाला नेमक्या गोष्टींची खरेदी करायची सवय लागेल. तसेच दर महिन्याला शॉपिंगला जाण्याऐवजी दोन महिन्यातून एकदाच शॉपिंगला जा... यामुळे तुम्ही कमी वस्तू खरेदी कराल आणि नकळत तुमचे पैसे वाचतील.
डिस्काऊंट सेलमध्ये करा खरेदी
अनेकवेळा सणासुदीच्या काळात आपल्याला विविध वस्तूंवर सुट किंवा डिस्काऊंट असल्याचे पाहायला मिळते. डिस्काऊंट सेलमधून तुम्ही कपडे , भांडी , इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या विविध गोष्ट विकत घेऊ शकता.
किंमतींचा अभ्यास करा
कोणतीही वस्तू घेण्याआधी त्या वस्तूची विविध दुकानांमध्ये काय किंमत आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ , तुम्हाला वॉशिंग मशिन घ्यायची असेल तर विविध दुकानांमध्ये जाऊन मशिनच्या किमती काय आहे? त्याचे प्रकार काय आहेत ? याची माहिती काढा. बऱ्याच दुकानांमध्ये अशा वस्तूंवर 500 ते 1000 रुपयांचा फरक असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या दुकानांमधून वस्तूंच्या किमतींची तुलना व अभ्यास केल्यामुळे तुम्हाला त्या वस्तू इतरांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.
गाडीवर अधिक खर्च करू नका
गाडी जुनी झाल्यानंतर अनेकवेळा त्याच्यावर खूप खर्च करावा लागतो. त्यामुळे गाडीवर अधिक खर्च होत आहे असे वाटत असल्यास गाडी विकून टाकावी. काहीजण जुन्या गाडीवर इतका खर्च करतात की , त्या किमतीत ते नवीन गाडी घेऊ शकतात.