28 ऑक्टोबरला ट्विटर जाहीर केल्याप्रमाणे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आता युजर्सना NFT (Non Fungible Token) ची खरेदी व विक्री करणे शक्य होणार आहे. ट्विटरने एनएफटीच्या मार्केटप्लेसेससोबत केलेल्या पार्टनरशिपमुळे हे शक्य झाले. Twitterच्या ट्विट टाईल्स (Tweet Tiles) या नवीन फिचर्सवर आता NFT’s दिसणार आहेत. या फिचर्सवरून एका बटणाद्वारे NFT च्या मार्केटप्लेसमध्ये थेट प्रवेश करता येणार आहे.
ट्विटरसाठी हा आठवडा खूपच खडतर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी Twitter कंपनी विकत घेतल्यानंतर सर्वांनाच मोठमोठे धक्के देणं सुरू केले आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमधील हिरो व व्हिलन अशा दोन्ही भूमिका एकत्र बजावणारे मस्क, यांनी ट्विटरमध्ये बदल करण्यास सुरूवात केली. यापूर्वीही त्यांनी असे बदल करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यावरून त्यांचे ट्विटरच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी खटके उडत होते. त्यात मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण करून एक-एक धक्का द्यायला सुरूवात केली. सर्वप्रथम इलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, लीगल हेड विजया गाडे यांच्यासह आणखी काही बिगशॉट लोकांना कामावरून कमी केलं. मस्क यांचा हा धुमाकूळ चालू असतानाच गुरुवारी (दि.27 ऑक्टोबर) ट्विटरच्या डेव्हलपमेंट टीमने ट्विटर टाईल्सची (Tweet Tiles) घोषणा करून संपूर्ण मार्केटमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
एनएफटी म्हणजे काय? What is NFT?
NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT हे युनिक टोकन आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते. बिटकॉईन्सची जशी देवाणघेवाण करता येते, तशी NFT ची देवाणघेवाण करता येत नाही. कारण हे युनिक आर्ट पीस आहे. याचे प्रत्येक टोकन हे युनिक आहे. या डिजिटल टोकनला ओनरशिपचे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळते. तो त्याला एक प्रकारचा कॉपीराईटचा अधिकार देते.
iOS आणि Web वरही असणार ट्विट टाईल्स!
ट्विट टाईल्स या नवीन फिचरद्वारे NFT’s ची ट्रेडिंग करणे शक्य होणार आहे, अशी अधिकृत माहिती ट्विटरच्या डेव्हलपमेंट टीमने ट्विटरवर जाहीर केली. ट्विटर टाईल्सचे IOS आणि Web असे दोन्ही व्हर्जन्स उपलब्ध असणार आहेत. मागच्या आठवड्यात ट्विटर क्रिप्टो वॉलेट (Crypto Wallet) तयार करत असल्याची अनधिकृत बातमी जाहीर झाली होती. आता अधिकृतपणे ट्विटर NFT मार्केट मध्ये उतरत आहे. मस्क यांच्या टेकओव्हरनंतर ट्विटर क्रिप्टो मार्केटमध्ये तसेच इतर मार्केट्समध्ये देखील सक्रिय होण्याची शकण्याची शक्यता आहे.