• 07 Dec, 2022 09:42

News Impact on Crypto Market: इलॉन मस्क क्रिप्टोमार्केटमधील व्हिलेन आहे का?

News Impact on Crypto Market: इलॉन मस्क क्रिप्टोमार्केटमधील व्हिलेन आहे का?

इलॉन मस्कने क्रिप्टोमार्केटमध्ये त्याला असलेल्या इंट्रेस्टबद्दल अनेकवेळा ट्विट्रच्या माध्यमातून जगाला सांगितले आहे, पण यामुळे इतर गुंतवणूकदारांना मात्र मोठा फटका बसला आहे. इलॉन मस्कमुळे क्रिप्टोमार्केटमध्ये छोटी-मोठी वादळे आली आहेत.

शेअर मार्केट असो किंवा क्रिप्टोकरन्सी मार्केट एखाद्या मोठ्या गुंतवणूकदाराने किंवा एखाद्या कंपनीने ठराविक शेअर किंवा कॉईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मार्केटमधील इतर गुंतवणूकदार तोच शेअर किंवा तीच क्रिप्टोकरन्सी विकत घेण्याचा कल दिसून येतो. मोठ्या गुंतवणूकदारांच्या पोसिशन्स कॉपी करणे किंवा त्यांच्या सल्ल्यावरून एखाद्या कंपनीत गुंतवणूक करणे अनेकवेळा फायद्याचे ठरू शकते. पण काही वेळेस अशा सल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसानही सहन करावे लागले.  मोठ्या गुंतवणूकदारांचे सल्ले खास करून त्यांचे ट्विट्स, मुलाखत किंवा एखाद्या कार्यक्रमातील वक्तव्याचा मार्केटवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येते. यामध्ये शेअर मार्केट आणि क्रिप्टो मार्केट या दोन्हीचा समावेश होतो.

ट्विट्स करून गुंतवणूकदारांना पेचात पडणारा क्रिप्टोमार्केटमधला सर्वात मोठा व्हिलेन  म्हणजे इलॉन मस्क (Elon Musk). क्रिप्टो मार्केटबद्दलची त्याची तळमळ आणि उत्सुकता वाखाण्याजोगी आहे. इलॉन मस्कने क्रिप्टोमार्केटमध्ये त्याला असलेल्या रुचिबद्दल अनेकवेळा ट्विट्रच्या माध्यमातून जगाला सांगितले आहे, पण यामुळे इतर गुंतवणूकदारांना मात्र मोठा फटका बसला आहे. इलॉन मस्कने आजपर्यंत अनेक ट्विट्स करून क्रिप्टोमार्केटमध्ये छोटी-मोठी वादळे आणली आहेत. मोठ्या गुंतवणूकदारांना ज्याप्रमाणे फॉलो केले जाते. त्याप्रमाणे मस्क यालासुद्धा काही क्रिप्टो गुंतवणूकदार फॉलो करतात. त्यामुळे त्या गुंतवणूकदारांना काही वेळेस नुकसान सहन करावे लागले.

क्रिप्टोमार्केटमध्ये एकतर अस्थिरता खूप आहे. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या बातम्यांचा त्यावर लगेच परिणाम दिसून येतो. पूर्वी हा प्रकार शेअर मार्केटमध्ये दिसून येत होता. पण आता शेअर मार्केटबद्दल लोकांना बरीच माहिती झाल्यामुळे अशा बातम्यांचा पूर्वीसारखा शेअर मार्केटवर परिणाम दिसून येत नाही. म्हणजे काही बातम्यांचा किंवा सरकारच्या निर्णयांचा मार्केटवर नक्कीच परिणाम दिसून येतो. त्यानुसार मार्केट रिअॅक्ट सुद्धा होतं. पण विनाकारण चुकीच्या बातम्यांमुळे आता तितकासा परिणाम मार्केटवर दिसून येत नाही.

क्रिप्टोकरन्सीचे मूळ वैशिष्ट्य त्याची विकेंद्रितता आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या ट्विट्समुळे किंवा मतांमुळे मार्केटवर परिणाम होत असेल तर हा क्रिप्टोकरन्सीच्या बेसिक फंडावरच घाव बसण्यासारखे आहे. ट्विट्समुळे मार्केटमध्ये होणाऱ्या उलाढालीमुळे नव्या गुंतवणूकदारांच्या मनात क्रिप्टोकरन्सीच्या अस्थिरतेबद्दलची भीती निर्माण होते. मार्केट अत्यंत अस्थिर व असुरक्षित दिसते ज्यामुळे नियमकांचे लक्ष वेधले जाते. ह्या सर्व गोष्टीमुळे बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या मुख्य तत्वाला, ज्यावर बिटकॉइनची निर्मिती आधारित आहे, त्याला धक्का बसतो. कोणतेही सरकार बिटकॉईनवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि कोणतेही सरकार ते बंद देखील करू शकत नाही. 

दरम्यान, मस्क यांनी टेस्ला (TESLA) ही कंपनी बिटकॉईनमध्ये 1.5 बिलिअन डॉलर्स गुंतवणार असल्याचे ट्विटद्वारे सांगितले. त्यामुळे बिटकॉईनच्या किमतीवर लगेच परिणाम झाला. बिटकॉईनची किंमत 50 हजार डॉलर्सवर पोहोचली. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात मस्क यांनी बिटकॉईनच्या मायनिंगसाठी लागणाऱ्या ऊर्जा स्त्रोताच्या वापराच्या प्रश्नाबद्दल चिंता व्यक्त करत टेस्ला कंपनी बिटकॉईन स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे बिटकॉईनची किंमत पत्त्यासारखी कोसळली. त्यानंतर बिटकॉईन मायनिंगबद्दलच्या सकारात्मक ट्विटमूळे मार्केटने पुन्हा सकारात्मक परिणाम दाखवला. म्हणजे बातम्यांचा चांगला किंवा वाईट परिणाम क्रिप्टोमार्केटवर दिसून येतो.

मस्क यांचे डोजकॉईनवरचे प्रेम तर सर्वानाच ठाऊक आहे. विनोदातून निर्माण झालेल्या डोजकॉईनबद्दल मस्क यांनी अनेकवेळा ट्विट केले आहे. एका शो वर त्यांनी डोजकॉइनबद्दल केलेल्या विधानाने, डोजकॉइनची किंमत भरपूर वाढली. त्यानंतर त्यांनी केलेल्या विनोदामुळे पुन्हा किंमत घसरली. त्यांच्या ह्या ट्विट्समुळे सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसतो. सामान्य गुंतवणूकदारांना जर सतत असे फटके सोसावे लागले तर, नियामक क्रिप्टो मार्केटवर नियम आणण्याची शक्यता आहे. अनेक लोकांना त्यांच्या ह्या वागणुकीमुळे पैसे गमवावे लागले आहेत.

स्वतःकडील शक्तींचा वापर करून मार्केट मध्ये हालचाल आणणारे मस्क हे केवळ एकटेच नाहींत. अनेक लोकांनां अशी विधानं करण्यासाठी कॉईन्स कडून पैसे दिले जातात. जेव्हा अशी विधानं केली जातात तेव्हा आपल्यासारखे गुंतवणूकदार त्यावर थोडा जास्तच विचार करून आपल्या पोसिशन्स ठरवतात. अनेकवेळा अश्या विधानांना जास्तीचे महत्व मिळते व हे महत्व देणारे आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना अश्या प्रकारच्या विधानांच्या दबावाखाली येऊन ट्रेडिंग करू नये. मार्केट मध्ये विधानांना व खास करून ट्विट्सना कशाप्रकारे प्रतिक्रिया मिळते हे मस्क ह्यांच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेच असेल. तुम्ही जर अशा विधानांना रिअॅक्ट करत असाल किंवा करणार असाल तर वेळीच सावधान व्हा !!