PPF Investment : पीपीएफ योजना 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे व्यक्तींना लहान बचत करण्यात प्रोत्साहीत करणे आणि बचतीवर परतावा देणे हा होय. PPF योजना आकर्षक व्याजदर देते आणि मुख्य म्हणजे व्याजदरातून मिळणाऱ्या परताव्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. त्यामुळे ही योजना गेल्या अनेक वर्षांपासुन गुंतवणूकदारांच्या आवडीची योजना बनली आहे.
Table of contents [Show]
आजच करा गुंतवणूक
जर का तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहात, तर आजचा (5 एप्रिल) दिवस तुमच्यासाठी खास आहे. आणि जर का आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पीपीएफ वर अधिक व्याजदर मिळावा, अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस उरलेला आहे. तुम्हाला तुमचे पैसे आजचं पीपीएफ खात्यात जमा करावे लागेल. जर तुम्ही तुमच्या पीपीएफ मध्ये 5 एप्रिल नंतर पैसे जमा केले, तर तुम्हाला पीपीएफ शिल्लक रकमेवर कमी व्याज मिळेल. याचं कारण म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंड फंडाच्या नियमानुसार, दर महिन्याच्या पाचव्या दिवशी तुमच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याज मोजलं जातं. त्यामुळे जास्त व्याज मिळवायचं असेल तर 5 तारीख लक्षात घेऊन या तारखेच्या आत तुम्ही पीपीएफ खात्यात पैसे जमा केले पाहिजेत.
दर महिन्याला किंवा नियमितपणे पीपीएफमध्ये पैसे टाकणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वर्षातून एकदाच पीपीएफ खात्यात पैसे जमा करत असाल तर ते पैसे 5 एप्रिलच्या आत जमा केले तर त्यावर जास्त व्याज तुम्हाला मिळेल. नाहीतर पुढच्या व्याजाच्या सायकलमध्ये पैसे धरले जातील. पीपीएफ खात्यात सरकार वर्षातून चारदा आणि दर तीन महिन्यांनी व्याज जमा करतं. आणि दर वेळी महिन्याची पाचवी तारीख त्यासाठी धरली जाते.
तिहेरी कर लाभ असलेली योजना
यामुळेच पब्लिक प्रोव्हिडंट फंडच्या गुंतवणूक करीता प्रत्येक महिन्याची पाच तारीख खूप महत्वाची आहे. पीपीएफमधील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत खात्यातील किमान शिल्लक रकमेवर मोजले जाते. त्यामुळे तुम्ही दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा केल्यास तुमची किमान शिल्लक वाढते आणि तुम्हाला जास्त व्याज मिळते. पीपीएफला तिहेरी कर लाभ असलेली योजना असेही म्हटले जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही एका वर्षात 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली, तर त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या संपूर्ण रकमेवर कोणताही कर लागणार नाही.
यावेळचा व्याजदर काय आहे ?
पीपीएफ ही एक पोस्ट ऑफिस योजना आहे. पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. यंदा एप्रिल-जून तिमाहीचे नवीन दर ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये बहुतांश योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मात्र पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. हे दर 7.1 टक्केच ठेवण्यात आले आहे.
15 वर्षांची मॅच्युरिटी योजना
'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते' ही केंद्र सरकारची दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. जी पीपीएफ कायदा, 1968 मध्ये सुरु झाली. पीपीएफ ही 15 वर्षांची मॅच्युरिटी योजना आहे. ही योजना तुम्ही तुमच्या सोईनुसार दर पाच वर्षांनी रिन्यू करु शकता. पीपीएफ खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 12 वेळा पैसे जमा करता येतात. मात्र, अनेक गुंतवणूकदार वारंवार पैसे गुंतवण्याऐवजी एकरकमी रक्कम गुंतवतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2008 मध्ये PPF खाते उघडले असेल तर, ते एप्रिल 2023 मध्ये परिपक्व (Matured) होईल.