Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

YouTube CEO: नील मोहन कोण आहेत? ज्यांच्या हाती सोपवलीये YouTube CEO पदाची धुरा, जाणून घ्या

Neal Mohan New CEO of YouTube

Image Source : www.techcrunch.com

YouTube CEO: भारतीय वंशाचे नील मोहन (Neal Mohan) ग्लोबल ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनले आहेत. या निमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

आजच्या घडीला भारतीय तरुणाईचा डंका जगभर गाजत असलेला पाहायला मिळत आहे. गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, आयबीएमचे अरविंद कृष्णा आणि Adobe चे शंतनू नारायण यांच्यानंतर आता YouTube च्या सीईओ पदावर भारतीय वंशाचे नील मोहन (Neal Mohan) यांची नियुक्ती केली गेली आहे. नील मोहन हे 2008 पासून गुगलसोबत काम करत आहेत. सीईओ होण्यापूर्वी ते यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर (Chief Product Officer) म्हणून कार्यरत होते.


ग्लोबल ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुसान वोज्स्की (Susan Wojcicki) यांनी गुरुवारी (16 फेब्रुवारी) आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. स्वतःचं आरोग्य, कुटुंब आणि वैयक्तिक बाबींवर लक्ष देण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी  सांगितलं. त्या Google मधील जाहिरात उत्पादन विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. 2014 मध्ये त्यांनी YouTube ची धुरा हाती घेतली होती. मात्र आता त्यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नील मोहन यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

नील मोहन यांचे शिक्षण काय?

49 वर्षीय नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून (Stanford University) 1996 साली इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. तर 2005 साली स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएचं शिक्षण घेतलं. जिथे त्यांना अर्जय मिलर स्कॉलर हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार टॉप 10 सर्वोच्च ग्रेड पॉइंट (GPA) असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो.

करिअरची सुरुवात कशी झाली?

नील मोहन यांनी 1996 मध्ये एक्सेंचर (Accenture) कंपनीतून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर नेटग्रॅव्हिटी (NetGravity) नावाच्या स्टार्टअपमध्ये ते सामील झाले, जे नंतर 2002 मध्ये इंटरनेट जाहिरात फर्म डबलक्लिकने (DoubleClick) विकत घेतले. दोन वर्षांचा एमबीए कोर्स आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काही काळ काम केल्यानंतर, नील मोहन पुन्हा डबलक्लिकमध्ये परतले. एप्रिल 2007 मध्ये Google कंपनीचा सेल 3.1 बिलियन डॉलर्स करून देण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

2015 पासून YouTube चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर

Google मध्ये, नील मोहन यांनी फर्मच्या डिस्प्ले आणि व्हिडिओ जाहिरात व्यवसायाचं  नेतृत्व केलं, 2008 ते 2015 पर्यंत YouTube, Google Display Network, AdSense, AdMob आणि DoubleClick यासारख्या जाहिरात तंत्रज्ञान उत्पादनांसाठी त्यांनी जाहिरातींच्या ऑफरिंगची जबाबदारी सांभाळली. Google च्या जाहिरात ऑफर्सला चालना देण्यासाठी नील मोहन यांनी Invite Media, Admeld आणि Teracent यासह अनेक धोरणात्मक स्टार्टअपचे नेतृत्व केले.

Google च्या ऑनलाईन जाहिरात व्यवसायाच्या प्रमुख असलेल्या सुसान वोज्स्की (Susan Wojcicki) यांनी 2014 मध्ये YouTube CEO म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर नील मोहन 2015 मध्ये YouTube चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर (Chief Product Officer) बनले.

YouTube प्रॉडक्ट्स मधील त्यांचे योगदान


Neal Mohan New CEO of Youtube


नील मोहन यांचा YouTube उत्पादने लॉन्च करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. ज्यामध्ये YouTube Red समाविष्ट आहे. ज्याला कालांतराने YouTube Premium म्हणून पुनर्ब्रँड करण्यात आलं. ज्या अंतर्गत यूट्यूब म्युझिक (YouTube Music), लहान मुलांसाठी यूट्यूब किड्स अँप (YouTube Kids), थेट टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सर्विसकरिता यूट्यूब टीव्ही (YouTube TV) आणि त्याचेच शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ सर्विस म्हणून यूट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) अशी उत्पादने बनवली गेली.

याव्यतिरिक्त त्यांनी YouTube च्या ट्रस्ट आणि सेफ्टी टीमचे नेतृत्व ही केले.  युट्युब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली सामग्री नियंत्रित करणारी प्लॅटफॉर्म धोरणे आणि सामुदायिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याचे श्रेयही नील मोहन यांना द्यावं लागेल.