Franchisors Of Six Teams: आजपासून (15 June) पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे महाराष्ट्र प्रीमिअर लीगला (MPL) सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रीमिअर लीग (Maharashtra Premier League-MPL) क्रिकेट स्पर्धेचे 15 ते 29 जून दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार आहेत. राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट वर्तुळात पदार्पण केले आहे. छत्रपती संभाजी किंग्स संघाची (CSK) मालकी आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे आहे.
Table of contents [Show]
कोणता संघ कुणाचा?
'एमपीएल'च्या शिखर समितीने यावेळी संघांची नावे देखील निश्चित केली. सुहाना मसाले कंपनीचा पुणे संघ हा पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. पुनीत बालन समुहाचा संघ -कोल्हापूर टस्कर्स, इगल इन्फ्रा इंडीयाचा संघ -ईगल नाशिक टायटन्स, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजचा संघ -छत्रपती संभाजी किंग्ज, जेट्स सिंथेसिसचा संघ- रत्नागिरी जेट्स, कपिल सन्सचा संघ- सोलापूर रॉयल्स अशा नावांनी ओळखली जाणार आहे.
पुणे संघाचा मालक कोण?
महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा पुणे संघ हा पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जातो आहे. पुणेरी बाप्पा समुहाची फ्रंचाईजी सुहाना मसालेनी घेतली आहे. सुहाना मसाले कंपनीचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया हे होते. 2022 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले राजकुमार,डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार ही कंपनी सांभाळत आहे. सुहाना सोबतच प्रवीण आणि अंबारी मसाले हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. सुहाना मसाले कंपनीने पुणेरी बाप्पा संघ 14 कोटी 8 लाख रुपयांमध्ये घेतला. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
कोल्हापूर टस्कर्स संघ
महाराष्ट्र प्रीमिअर लीग मधील कोल्हापूर टस्कर्स संघाची फ्रंचाईजी पुनीत बालन समूहाने घेतली आहे. पुनीत बालन एक उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रिकेटर असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची स्वतंत्र ओळख आहे. पुनीत बालन समूहाने कोल्हापूर टस्कर्स संघ 11 कोटी रुपयांना घेतला आहे. केदार जाधव हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
ईगल नाशिक टायटन्स
महाराष्ट्र प्रीमिअर लीग मधील ईगल नाशिक टायटन्स संघाची फ्रंचाईजी इगल इन्फ्रा इंडीयाने घेतली आहे. इगल इन्फ्रा इंडीयाचे सीईओ उद्धव रुपचंदानी हे आहेत. इगल इन्फ्रा ही बांधकाम क्षेत्रातील नावाजलेली कंपनी आहे. त्यांनी ईगल नाशिक टायटन्स हा संघ 9 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतला आहे. राहुला त्रिपाठी हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
छत्रपती संभाजी किंग्ज
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने छत्रपती संभाजी किंग्ज हा संघ 8 कोटी 70 लाख रुपयांना विकत घेतला आहे. राजवर्धन हांगरगेकर हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
रत्नागिरी जेट्स
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील रत्नागिरी जेट्स या संघाची फ्रंचाईजी जेट्स सिंथेसिसने घेतली आहे. जेट सिंथेसिस कंपनीचे सीईओ क्रिस गोपालकृष्णन आणि राजन नवनी हे आहेत. जेट सिंथेसिस कंपनीने रत्नागिरी जेट्स हा संघ 8 कोटी 30 लाख रुपयांना विकत घेतला आहे. अजिम काझी हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
सोलापूर रॉयल्स
महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील सोलापूर रॉयल्स या संघाची फ्रंचाईजी कपिल सन्सने घेतली आहे. कपिल सन्सने सोलापूर रॉयल्स हा संघ 70 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतला आहे. विकी ओसवाल हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.