Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual funds vs FD : म्युच्युअल फंड एसआयपीनं एफडीपेक्षा कमी परतावा दिला? जाणून घ्या...

Mutual funds vs FD :  म्युच्युअल फंड एसआयपीनं एफडीपेक्षा कमी परतावा दिला? जाणून घ्या...

Mutual funds vs FD : चांगला परतावा मिळण्यासाठी अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यात काही जण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात तर काही जणांना एफडीमधली गुंतवणूक सुरक्षित वाटते. या दोन्हीमध्ये नेमकं काय निवडलं पाहिजे, परतावा कसा असावा, याविषयी जाणून घेऊ...

जास्त परतावा मिळण्यासाठी अनेकांची म्युच्युअल फंडांना पसंती असते. मात्र मागच्या काही काळाचा विचार केल्यास अनेक म्युच्युअल फंडांनी एका वर्षाच्या कालावधीच्या मुदत ठेवीपेक्षा कमी परतावा दिल्याचं दिसून आलंय. बँकांमार्फत एक वर्षाच्या एफडीवर सध्या 6 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान व्याज दर दिलं जातं. मात्र दुसरीकडे अनेक म्युच्युअल फंड योजनांनी याच वर्षभराच्या कालावधीत 6 टक्क्यांपेक्षा कमी परतावा दिलाय. उदाहरण घ्यायचं झालं तर 12 ईटीएफ/इंडेक्स फंड (12 ETF/Index Funds) आणि सेव्हन सेक्टोरल/थीमॅटिक इक्विटी म्युच्युअल फंडांनी (seven Sectoral/Thematic Equity Mutual Funds) एका वर्षात 6 टक्क्यांपेक्षा कमी परतावा दिलाय. एएमएफआयच्या (AMFI) वेबसाइटवर 11 मे 2023ला हा संपूर्ण डेटा पाहायला मिळेल.

नकारात्मक परतावाही दिला

हायब्रीड श्रेणीतल्या 14 आर्बिट्राज फंडांनी मागच्या एका वर्षात 6 टक्क्यांपेक्षादेखील कमी परतावा दिलाय. तसंच इक्विटी स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप आणि फोकस्ड स्कीम श्रेणीतल्या प्रत्येकी एका फंडानं एका वर्षात 6 टक्क्यापेक्षा कमी परतावा दिलाय. विशेष म्हणजे काही फंडांनी तर वर्षभरात नकारात्मक परतावादेखील दिल्याचं दिसून आलंय. त्यामुळे अनेकजण चांगल्या परताव्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. मात्र यामुळे त्यांचा हिरमोड होतो. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करायला हवं, जेणेकरून एफडीपेक्षा अधिक चांगला परतावा मिळेल, याविषयी माहिती घेऊ...

दीर्घकालीन आकडेवारी काय?

ही आकडेवारी तर अल्पमुदतीत कमी परतावा देणारी आहे. मात्र मागच्या 23 वर्षांतल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास निफ्टी 50 टीआरआयचा (TRI) एक वर्षाचा एसआयपी रिटर्न 25 टक्केवेळा नकारात्मक आहे. आणखी 16 टक्के वेळा परतावा समाधानकारक नव्हता. म्हणजेच तो 0 टक्के आणि 7 टक्क्यांच्या दरम्यान दिसून आला.

तज्ज्ञांचं मत

एकूणच विचार केल्यास एका वर्षाच्या एसआयपीसाठी 7 टक्क्यांपेक्षा कमी परताव्याची शक्यता 40 टक्के राहिली आहे. 3 वर्षांच्या एसआयपीसाठी परताव्याची शक्यता 22 टक्के राहिल्याचं दिसतं. फंड्स इंडियाचे सिनिअर रिसर्च अ‍ॅनालिस्ट श्रीनाथ एमएल यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेसशी बोलताना ही माहिती दिली. इक्विटी एसआयपी सुरू करताना प्राथमिक अवस्थेत असे परिणाम सामान्य आहेत. मात्र पुढच्या 1-3 वर्षांत परतावा 10 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात वसूल होतो, असंही त्यांनी सांगितलं.

काय करायला हवं?

श्रीनाथ यांनी काही टिप्स सुचवल्या आहेत. गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावं. साधारणत: 7 वर्षांपेक्षा अधिक कालमर्यादा ही तात्पुरत्या कमी कामगिरीच्या टप्प्यांना सामावून घेण्यासाठी आणि दीर्घकाळात वाजवी परतावा देण्यासाठी पुरेशी असते, असं त्यांचं मत आहे. इक्विटी फंडांचा परफॉर्मन्स सामान्यतः वेगवेगळ्या बाबींमधून जात असतो. मूल्य, गुणवत्ता, मार्केट कॅप विभाग (मोठे, मध्यम आणि लहान), क्षेत्रे (आयटी, वित्तीय आदी) आणि बाजार (भारत, अमेरिका आदी). त्यामुळे आपणं योग्यवेळी योग्य असा निर्णय घ्यायला हवा. कारण जेव्हा सायकल बदलते, तेव्हा सर्वात चांगला निधी देखील अल्प-मुदतीच्या कमी कामगिरीच्या टप्प्यातून जातो, अशी माहिती त्यांनी दिली.

चांगला फंड कसा ओळखावा?

एखाद्या फंडाची दीर्घकालीन ऐतिहासिक कामगिरी चांगली आहे की नाही, हे तुम्ही तपासू शकता. तात्पुरत्या कमी कामगिरीतून जाणाऱ्या चांगल्या फंडाची ओळख करण्यासाठी हा मार्ग अवलंबता येईल. फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड ठोस आहे, गुंतवणुकीच्या फिलॉसॉफीत सातत्य, उत्तम पोर्टफोलिओ, वाजवी मूल्यांकन याबाबी तपासायला हव्यात. एक चांगला पोर्टफोलिओ मिळवण्यासाठी शैली, मार्केट कॅप आणि भौगोलिक क्षेत्रामध्ये 3-5ला प्राधान्य दिलं जाऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं.