• 03 Oct, 2022 22:35

हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) म्हणजे काय?

Hindu Undivided Family

एकाच कुटुंबातील वंशज एचयूएफ (HUF) तयार करू शकतात. कुटुंबाचा प्रमुख हा एचयूएफचा कर्ता असतो. पुरुष किंवा स्त्री ही कर्ता असू शकते.

इन्कम टॅक्स (Income Tax)मध्ये सवलत मिळवण्यासाठी करदाते नेहमीच नवनवीन मार्ग शोधत असतात. इन्कम टॅक्स कायद्यानुसार वेगवेगळ्या कलमांतर्गत सवलत मिळते. यात गुंतवणूक करण्यापासून, आरोग्य विमा (Health Insurance) ते मुलांच्या शाळेच्या फी वर सवलत मिळते. याशिवाय आणखी काही असा तरतुदी आहेत. ज्याची करदात्यांना माहिती नसल्यामुळे या करसवलतीचा फायदा घेऊ शकत नाही. त्यातील एक महत्त्वाची तरतूद म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF). इन्कम टॅक्स कायद्यानुसार एचयुएफ (HUF) अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते.

एकाच कुटुंबातील वंशज एचयूएफ (HUF) तयार करू शकतात. कुटुंबाचा प्रमुख हा एचयूएफचा कर्ता असतो. पुरुष किंवा स्त्री ही कर्ता असू शकते. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जन्माच्या आधारावर एचयूएफचे संयुक्त वारसदार असे म्हटले जाते आणि लग्नानंतर एचयूएफमध्ये आलेल्या व्यक्तींना सदस्य म्हणतात. उदाहरणार्थ, पत्नी, मुले आणि मुलांच्या पत्नी हे सर्व एचयूएफचे सदस्य असतात.

Hindu Undivided Family-HUF

इन्कम टॅक्स कायद्यातील तरतूद!

हिंदू अविभक्त कुटुंबाला इन्कम टॅक्स कायदा, 1961 च्या कलम 2(31) अंतर्गत 'व्यक्ती' म्हणून वेगळी ओळख दिली. HUF साठी वेगळा पॅन क्रमांक (PAN Card) देण्यात आला आहे आणि तो स्वतंत्रपणे टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करू शकतो.

एचयुएफ कसा होतो?

एचयुएफ म्हणून बँकेत खाते सुरू करावे लागते. हे खाते कुटुंबप्रमुखांच्या नावाने असते. मात्र त्यानंतर एचयुएफ असा शब्द जोडावा लागतो. त्यानंतर पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागतो. बँक खाते आणि पॅनकार्डची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर एचयुएफच्या भांडवलाची बाब समोर येते.

नियम आणि अटी

एचयुएफची निर्मिती केवळ विवाहित मंडळीच करू शकतात. जर आपण अविवाहित असाल तर एचयुएफ करू शकणार नाहीत. एचयुएफ अंतर्गत प्राप्तीकरात सवलत मिळवण्यासाठी आपल्या घरात मुलं असणे गरजेचे आहे. जर कुटुंबात पती-पत्नीला अपत्य नसेल तर आगामी काळात येणार्‍या मुलाचा उल्लेखही एचयुएफमध्ये करू शकतात. कायद्यानुसार हिंदू, शिख, बौद्ध आणि जैन हे एचयुएफ कायद्यांतर्गत येतात. मोठे एकत्र कुटुंब या कक्षेत येते. अर्थात एचयुएफचे सदस्य एचयुएफला गिफ्ट देऊन टॅक्स सवलत मिळवू शकत नाहीत.

असा लाभ मिळतो!

एचयुएफवर 80 सी (80C) अतंर्गत व्यक्तिगत दीड लाखांपर्यंत टॅक्स सवलत मिळवता येते. जर आपण एचयुएफतंर्गत येत असाल तर आपल्या उत्पन्नाची विभागणी करून आपण टॅक्समध्ये सवलत मिळवू शकतो. एखादा मुलगा आपले वडील एचयुएफमध्ये असतानाही वेगळे एचयुएफ निर्माण करू शकतो. यामध्ये तो आपली पत्नी, मुलगा यांना सामील करून एचयुएफची र्निर्मिती करू शकतो.

टॅक्स सवलतीत दोनदा लाभ

एचयुएफ तयार केल्यानंतर आपण इन्कम टॅक्समध्ये दोनदा लाभ घेऊ शकतो. पहिला म्हणजे व्यक्तिगत आणि दुसरा एचयुएफ सदस्य म्हणून. अन्य स्त्रोत उदाहरणार्थ, शेती, भाडे आदींतून मिळणार्‍या उत्पन्नाला एचयुएफमध्ये दाखविले तर त्यात सवलत मिळते.

हेही लक्षात घ्या

‘कलम 80 सी’नुसार एचयूएफ गुंतवणूक करू शकतो. तसेच कुटुंबाच्या सदस्याचा विमा हप्ता भरू शकतो. याखेरीज इक्विटी लिंक्ड बचत योजना, मुदत ठेव वगैरेमध्ये या कलमानुसार गुंतवणूक करू शकतो. परंतु सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये मात्र एचयूएफ गुंतवणूक करू शकत नाही.