भारतासारख्या देशात सोन्या-चांदीचे दागिने घालणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. भारतात प्राचीन काळापासून लोक या धातूंमध्ये गुंतवणूक करणे सर्वोत्तम मानतात. लग्न आणि सणासुदीच्या काळात याच्या खरेदीकडे लोकांचा अधिक कल असतो. त्यामुळे या काळात सोन्या-चांदीचे भाव चढ्या दराने असतात. सोने किंवा चांदीत गुंतवणूक करण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे . अनेकवेळा भेटवस्तू म्हणून देखील या वस्तू दिल्या जातात. अनेकवेळा घरातले सोन्या-चांदीचे दागिने वापरले जात नाहीत. तसेच एकाच प्रकारचे बरेचसे दागिने असतील तर ते तसेच पडून राहातात. त्यामुळे असे दागिने विकल्यास त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.
सोन्या-चांदीचे दागिने किंवा प्रत्यक्ष ते विकताना अनेकवेळा आपल्याकडून चुका होतात. त्यामुळे त्यांची योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे सोने, चांदी विकताना काय काळजी घ्यायची हे आपण समजून घेणार आहोत.
सोने-चांदी धातूंबद्दल अधिकची माहिती घ्या
सोने किंवा चांदीची एखादी वस्तू विकायचा विचार करत असाल तर त्या वस्तूची किंमत काय असू शकते याचा अंदाज लावणे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा त्याची खरी किंमत काय आहे हेच आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपली दुकानदाराकडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सोने किंवा चांदीची ज्या व्यक्तींना चांगली माहिती आहे, त्यांच्याकडून त्याचे वजन, शुद्धता याची माहिती घ्या. चांदी जास्त जुनी झाली तर त्याची किंमत खूपच कमी मिळते हे ही लक्षात ठेवा. कधीही सोने खरेदी करताना सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क चिन्ह आहे का हे पाहाणे गरजेचे असते. हे चिन्ह सोन्याची शुद्धता दर्शवते. सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे शुद्ध सोन्याला हे चिन्ह दिले जाते. हे चिन्ह असल्यास तुमच्या सोन्याला विकताना चांगली किंमत मिळू शकते.
सोने-चांदीला नेहमीच चांगला भाव असतो
सोने किंवा चांदीचे दागिने तुटले तर त्याला किंमत मिळत नाही, असे अनेकांना वाटते. पण ते सत्य नाही. सोन्या, चांदीच्या दागिन्यांना नेहमीच चांगली किंमत मिळते. केवळ त्या धातुच्या शुद्धतेवर त्याचा भाव ठरलेला असतो. जुने दागिने वितळवून त्याचे नवीन दागिने बनवता येतात. त्यामुळे सोन्याचा, चांदीचा भाव हा कायम चढाच असतो, हे लक्षात ठेवा.
किमतींचा अभ्यास करा
अनेक दुकानात, ऑनलाईन वेबसाईटवर सोने, चांदीच्या वस्तू विकल्या जातात. पण कोणत्याही दुकानात अथवा ऑनलाईन वेबसाईटवर सोन्याच्या, चांदीच्या वस्तू विकताना तुम्हाला योग्य किंमत मिळते आहे की नाही हे पडताळून पाहाणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला दागिने विकण्याऐवजी तुमच्या ओळखीच्या दुकानदाराला वस्तू विकल्यास तुमची फसवणूक होणार नाही. ओळखीच्या दुकानदाराला वस्तू विकताना ही दुसऱ्या दुकानांमध्ये त्या दागिन्यांना किती पैसे मिळतील याचा अंदाज काढा. अनेक दुकानांमध्ये चौकशी केल्यानंतरच तुमच्या वस्तूला योग्य किंमत मागता येईल.
तुमचा निर्णय तुम्हीच घ्या
सोने-चांदीच्या वस्तू विकताना तुमच्याकडे त्या वस्तूंची मूळ पावती असेल तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. मूळ पावतीवर वस्तूचे वजन, त्याची शुद्धता याविषयी योग्य माहिती दिलेली असते. पण तुमच्याकडे पावती नसल्यास वस्तूचे योग्य वजन दुकानदार करत आहे की नाही हे तपासावे. दुकानदाराने ठराविक किंमत सांगितल्यानंतर ती रक्कम तुम्हाला योग्य वाटते का, तुम्हाला त्या किमतीत वस्तू विकायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय तुम्हालाच घ्यायचा असतो.
कोणालाही सोने विकू नये
तुम्ही आमच्याकडे सोने विकले तर तुम्हाला आम्ही योग्य किंमत देऊ असे अनेकजण सांगत असतात. त्यामुळे अनेकवेळा पैशांची गरज असल्यास लोक सोनाराच्या दुकानात अथवा योग्य व्यवसायिकाकडे न जाता अनोळखी लोकांना देखील सोने विकतात. त्यामुळे त्यांच्या दागिन्यांना योग्य किंमत मिळत नाही.
घाईत निर्णय घेऊ नका
अनेकवेळा पैशांची गरज असल्यास कोणताही विचार न करता लोक सोने विकतात. ग्राहकाला पैशांची गरज आहे हे लक्षात आल्याने दुकानदार देखील अतिशय कमी किमतीत सोन्याची वस्तू विकत घेतात. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका.
किमतीकडे लक्ष द्या
अनेकजण पैशांची तातडीने गरज पडल्यावर घरातील सोने किंवा चांदी विकतात. त्यावेळी बाजारात सोने, चांदीचा भाव काय आहे हे तपासायला वेळ मिळत नाही. पण तुम्हाला तातडीने पैशांची गरज नसल्यास तुम्ही सोन्याचा, चांदीचा भाव वाढल्यानंतर ते विकू शकता. यांचे भाव दिवसाला बदलत असतात. त्यामुळे त्याचा योग्य भाव मिळण्याची वाट पाहूनच ते विकण्याचा निर्णय घ्या.
कोणत्याही आमिषांना भूलू नका
तुम्ही जास्त प्रमाणात सोने विकणार असाल तर दुकानदाराकडून अनेक सुविधा दिल्या जातात. तुम्हाला घरापासून दुकानापर्यंत येण्यासाठी गाडी पाठवली जाते. तुमचे आदरतिथ्य केले जाते. या गोष्टींना भुलून अनेकजण दुसऱ्या दुकानदाराकडून वस्तूची किंमत काढत नाहीत आणि कमी किमतीत वस्तू विकतात. कधीही सोने-चांदीचे दागिने विकताना काळजी घेतल्यास तुमचे नुकसान होणार नाही.