Gold Bhishi: गोल्ड भिशीबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण भिशी म्हणजे काय? याची थोडक्यात माहिती करून घेऊ. प्रचलित भिशीमध्ये 10 ते 12 जणांचा समूह प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे गोळा करतात आणि ते जमा झालेले पैसे समुहातील एका सदस्याला देतात. अशाप्रकारे प्रत्येक सदस्याला अशी जमा झालेली रक्कम मिळते, त्याला भिशी म्हटले जाते. गोल्ड भिशीमध्ये मात्र ही रक्कम सोनाराकडे किंवा ज्वेलर्समध्ये जमा केली जाते आणि या भिशीमध्ये लगेच एका महिन्यात काही मिळत नाही. गुंतवणूकदाराला गोल्ड भिशीमध्ये किमान 11 महिने स्वत: गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर 12 वा हप्ता सोनाराद्वारे भरून जमा झालेल्या रकमेतून गुंतवणूकदाराला सोने खरेदी करता येते.
Table of contents [Show]
11 हप्ते गुंतवणूकदाराचे 12 वा हप्ता सोनाराकडून
गोल्ड भिशी या सोन्याची पेढी चालवणारे सोनार किंवा ज्वेलर्स यांच्याद्वारेच चालविल्या जातात. गोल्ड भिशी अंतर्गत 12 महिन्यांपासून 36 महिन्यांपर्यंत पैसे गुंतवण्याची योजना सोनारांकडे असते. उदाहरणार्थ, गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये गोल्ड भिशीमध्ये गुंतवत असेल. तर त्याला असे 11 महिन्यांपर्यंत 1 हजार रुपये गुंतवावे लागतात. शेवटचा 12 वा हप्ता हा सोनाराद्वारे भरला जातो. त्यातून जमा झालेल्या एकत्रित रकमेतून गुंतवणूकदार सोने खरेदी करू शकतो. ही सर्वसाधारण गोल्ड भिशीची पद्धत आहे.
ज्वेलर्स आणि सोनार नियम ठरवतात
भिशीमध्ये जसे ग्रुपद्वारे नियम बनवले जातात. तसेच गोल्ड भिशीमध्ये ज्वेलर्स किंवा सोनारांद्वारे नियम ठरवले जातात. यामध्ये काही सोनार 1 वर्षांपासून 3 वर्षांपर्यंतची भिशी चालवतात. तर काही सोनार शेवट्या महिन्यातील हप्ता भरण्याऐवजी गुंतवणूकदाराला एखादे गिफ्ट देतात. काही ज्वेलर्स जमा झालेल्या रकमेतून गुंतवणूकदाराने सोन्याचा दागिना बनवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला सोन्याच्या घडणावळीवर सूट दिली जाते. अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गोल्ड भिशीची योजना आखली जाते.
गोल्ड भिशी कायद्याच्या कक्षेत येते?
गोल्ड भिशी योजना कायद्याच्या कक्षेत येते का? याचे थेट उत्तर नाही किंवा हो असे सांगता येत नाही. कारण अशा प्रकारच्या योजना लोकांना हव्याहव्याशा वाटत असतात. जोपर्यंत ही योजना व्यवस्थित चालते. तोपर्यंत ती योग्य असते. पण त्यात फसवणूक झाली की, ती चुकीची ठरते. पण भिशीप्रमाणेच याला कायद्याचे बंधन नाही. या अशा योजना सामंजस्याने चालवल्या जात आहेत. काही ग्राहकांना एकदम मोठी रक्कम जमा करून सोने खरेदी करता येत नाही. पण अशाप्रकारे छोटी-छोटी रक्कम जमा करून ठराविक कालावधीने मात्र सोने खरेदी करता येते. त्यामुळे समाजातील काही घटकांमध्ये ही योजना प्रसिद्ध आहे.
गोल्ड भिशीमध्ये जोखीम किती?
गोल्ड भिशीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सोनाराची पेढी किंवा ज्वेलर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तो तुमच्या परिचयातील असेल तरच त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. अन्यथा अशा योजनांमधून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच गोल्ड भिशीमधून तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर ते सोने नीट पारखून घेणे गरजेचे आहे. त्याची शुद्धता आणि किंमत तपासूनच घ्यायला हवी. बऱ्याचवेळा काही सोनारांकडून 24 कॅरेट सोन्याचा भाव सांगून 22 किंवा 18 कॅरेट सोन्याचे दागिने माथी मारले जातात. ज्याची मार्केटमध्ये खूपच कमी किंमत असते. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमार्क आणि कॅरेटची शुद्धता तपासणे आवश्यक आहे.
सोन्याची घडणावळ आणि सोन्यातील घट!
सोन्याची घडणावळ आणि सोन्यातील घट हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. कारण गोल्ड भिशी पूर्ण करणाऱ्या ग्राहकाला सोन्याच्या घडणावळीवर विशिष्ट सूट देतो असे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष घडणावळीचा दर काय हे माहित नसेल तर सूट किती दिली जात आहे, हे कळणार नाही. त्यामुळे सोन्याच्या घडणावळीचा दर आणि सोन्यातील घट कशी आकारली जाते. याची माहिती करून घेतल्यास फसवणूक होणार नाही.