अलिकडेच एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे आली होती. त्याआधी सुरू असलेली हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याचवेळी एअर इंडियामध्ये विस्ताराच्या विलिनीकरणाची चर्चा देखील सुरू झाली होती. ही विलिनीकरण प्रक्रिया पार पडल्यानंतर नवीन कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सची २५.१ टक्के इतकी हिस्सेदारी राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास मात्र आणखी काही कालावधी जाणार आहे. सध्या ही प्रक्रिया प्रस्तावित असली तरी 2024 मध्ये पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणानंतर एअर इंडिया अव्वल ठरणार
विस्ताराचे विलीनीकरण प्रक्रिया पार पडल्यानंतर एअर इंडिया आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान सेवा देणारी देशातील अव्वल क्रमाकांची कंपनी ठरणार आहे. याचबरोबर देशांतर्गत विमान वाहतूक सेवा देणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरणार आहे.
एअर इंडिया सेवांची व्याप्ती वाढवणार
विलिनीकरण व्यवहाराचा एक भाग म्हणून एअर इंडिया सेवा जाळे आणि विमानांचा ताफा दोन्हींमध्ये वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. याचबरोबर ग्राहकांच्या सेवा, त्यांची सुरक्षा, विश्वासार्हता यांसारख्या मुद्द्यावर फोकस करणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याविषयीचे धोरण स्पष्ट केले आहे. हे विलीनीकरण म्हणजे एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान वाहतूक कंपनी बनवण्याच्या प्रवासातील एक महत्वाची स्टेज आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी टाटा समूह प्रयत्नशील असल्याचे याविषयी बोलताना एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
टाटा समूहाकडे चार हवाई सेवा कंपन्यांची मालकी
टाटा समूहाकडे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या चार हवाई सेवा कंपन्यांची मालकी आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये टाटा समूहाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते.
सध्या टाटा समूहाची ‘विस्तारा’मध्ये 51 टक्के हिस्सेदारी आहे तर उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे. विस्तारा आणि एअर इंडियाचे विलिनीकरण केले जाणार आहे. या व्यवहाराचा भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सकडे असलेल्या 17.5 अब्ज सिंगापूर डॉलरच्या राखीव निधीमधून एअर इंडियाला ही रक्कम देणार असल्याचे सिंगापूर एअरलाइन्सने सांगितले आहे. टाटा समूहही 2022-23 आणि 2023-24 मध्ये एअर इंडियाच्या वाढीसाठी निधी देणार आहे.