टोमॅटोचे (Tomato) दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. चार दिवसांपूर्वी 100 रुपये किलो असणारा टोमॅटो आता 150-160 रुपयांच्या आसपास गेला आहे. टोमॅटोच्या किंमती वाढल्यानं त्या चोरीच्या (Theft) घटनाही वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. चोरीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) बसवले जात आहेत. सीएनबीसीनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
कर्नाटकात उत्पादन जास्त
अॅपेडानुसार (Agricultural and Processed Food Products Export Development Authority) देशातल्या टोमॅटोच्या संपूर्ण बाजारपेठेत कर्नाटक राज्याचा वाटा हा जवळपास 10.23 टक्के इतका आहे. टोमॅटोच्या उत्पादनात संपूर्ण देशात कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सध्याच्या घडीला कर्नाटकात एक किलो टोमॅटोचा भाव 130 रुपये किलोवरून 160 रुपये किलोवर पोहोचला आहे.
सीसीटीव्ही लावून टोमॅटोची विक्री
कर्नाटकातही ही स्थिती असली तरी दोनच दिवसांपूर्वी टोमॅटोची चोरी कर्नाटकातच झाली होती. तब्बल अडीच लाख रुपयांचा टोमॅटो चोरट्यांनी लंपास केला होता. आता शेतकरी आणि टोमॅटो विक्रेते सीसीटीव्ही कॅमेरे लावून टोमॅटोची विक्री करत आहेत.
ग्राहकांची संख्या वाढते तेव्हा...
भाजी विक्रेते टोमॅटोच्या मध्यभागी सीसीटीव्ही लावत आहेत. म्हणजे ते व्यस्त असतील तेव्हा कोणीही टोमॅटो चोरू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. जेव्हा ग्राहकांची संख्या वाढते, त्यावेळी सर्वच ठिकाणी लक्ष देता येत नाही. अशावेळी भाजीविक्रेत्याची नजर चुकवून टोमॅटो घेऊन पसार होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, असं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
अडीच लाख रुपयांचं नुकसान
कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यात असलेल्या बेलूर, धारणीजवळच्या गोनी सोमनहल्ली गावात अशीच भली मोठी चोरी झाली. इथला एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्या शेतात पूर्ण पिकलेल्या टोमॅटोची काढणी करण्याच्या तयारीत होता. अशातच रात्रीच्या वेळी चोरट्यांनी काढणीला आलेला तब्बल 50 ते 60 पोती भरेल इतका माल लुटून नेला. यात शेतकऱ्याला जवळपास अडीच लाख रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.