गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले दिसत आहेत. रोज टोमॅटोच्या दरात भाववाढ होत असल्यामुळे सामन्य नागरिक हैराण आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 155 रुपये किलोवर पोहोचले आहेत. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे आणि टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे ही भाववाढ होते आहे.
पावसामुळे पुरवठा खंडित
देशभरात सध्या पावसाने जोर धरला आहे. महाराष्ट्रासह उत्तरी राज्यांमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना बाजारात माल आणणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे उपलब्ध टोमॅटो चढ्या भावाने विकले जात आहेत. देशातील काही महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 58 ते 148 रुपये प्रतिकिलो होते. कोलकात्यात टोमॅटोचा भाव सर्वाधिक 148 रुपये प्रतिकिलो नोंदवला गेला आहे. तर मुंबईत 60-65 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. ठाणे शहरांत 1 किलो टोमॅटोसाठी नागरीकांना 58-60 रुपये मोजावे लागत आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात टोमॅटोची सरासरी किंमत 83.29 रुपये प्रति किलो आहे. टोमॅटोसाठी वेगवगेळ्या शहरांत वेगवेगळी किमत आकारली जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील काही शहरांमध्ये अजूनही टोमॅटो 2025 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे टोमॅटोचा सर्वाधिक भाव 155 रुपये प्रति किलो असल्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
आंध्र प्रदेश सरकार सतर्क
टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक भार पडत आहे. साठेमारी होऊ नये आणि सामन्यांचे बजेट कोलमडू नये यासाठी आंध्र प्रदेश सरकारने टोमॅटोचे दर रोखण्यासाठी प्रति किलो 50 रुपये दर निश्चित केला आहे. राज्यात कोणताही दुकानदार 50 रुपये किलोपेक्षा जास्त दराने टोमॅटो विकताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश सरकारने जारी केला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे आणि साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांना लगाम लागला आहे.