सध्या देशभरात वंदे भारत ट्रेनचे (Vande Bharat Express Train) जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील 3 वर्षात संपूर्ण देशात 400 वंदे भारत ट्रेन्स देशातील वेगवेगळ्या मार्गावर धावताना पाहायला मिळतील. सध्या देशातील काही मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्यात येत आहे. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे ‘मुंबई-पुणे-सोलापूर’. (Mumbai-Pune-Solapur New Route of Vande Bharat Train)
या मार्गावरील ट्रेनला 10 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM. Narendra Modi) हिरवा कंदील दाखवला. तेव्हा पासून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस मोठ्या दिमाखात धावत आहेत. सुरुवातीला महाग वाटणाऱ्या या ट्रेनला प्रवाशांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. नुकतेच या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला 45 दिवस पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने तिची 45 दिवसातील कमाई जाणून घेऊयात.
कमाईपूर्वी वेळापत्रक जाणून घ्या
वंदे भारत ट्रेनची 45 दिवसांची कमाई जाणून घेण्याअगोदर तिचे वेळापत्रक (Timetable) जाणून घेणे गरजेचे आहे. त्यावरून आपल्याला तिच्या फेऱ्यांचा अंदाज येईल आणि त्यातून आपण कमाई (Income) समजून घेऊ शकतो.
सध्या वंदे भारत ट्रेन सोलापूरवरून सकाळी 6.50 मिनिटांनी सुटते, जी पुढे पुण्यात 9 वाजता पोहचते. एका छोट्या ब्रेकनंतर हीच ट्रेन मुंबईसाठी रवाना होते, जी मुंबईत 12.30 मिनिटांनी पोहचते. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर हीच वंदे भारत ट्रेन सोलापूरसाठी पुन्हा रवाना होते.
मुंबईहून ठीक दुपारी 4 वाजता ही ट्रेन सोलापूरसाठी निघते. 7.30 च्या सुमारास ही पुण्यात पोहचते आणि त्यानंतर रात्री 10.30 वाजता ही ट्रेन सोलापूर स्थानकात हजेरी लावते. वंदे भारत एक्सप्रेसची ही सेवा प्रवाशांसाठी आठवड्यातून 6 दिवस चालू असते. फक्त बुधवारी मुंबईहून आणि गुरुवारी सोलापूरहून ही ट्रेन चालवली जात नाही.
45 दिवसात ‘इतक्या’ क्षमतेने धावली वंदे भारत ट्रेन
गेल्या 45 दिवसात मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावरील प्रवाशांचे या ट्रेनने प्रवास करण्याचे प्रमाण समजून घ्यायला हवे. वंदे भारत ट्रेनचे तिकीट हे इतर गाड्यांच्या तुलनेत थोडं महाग आहे. मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) या मार्गावर गेल्या 45 दिवसात 100 टक्के प्रवासी क्षमतेने ही ट्रेन धावली आहे. तर पुणे ते सोलापूर (Pune to Solapur) या मार्गावर ही ट्रेन 75 टक्के प्रवासी क्षमतेने धावली आहे.
45 दिवसात वंदे भारत ट्रेनने केली ‘इतकी’ कमाई
गेल्या 45 दिवसात जवळपास 50,000 प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला आहे. यातून रेल्वेला 4 कोटींहून अधिक रक्कम उत्पन्न म्हणून मिळाली आहे. त्यामुळे सुरुवातीला महाग वाटणारी ट्रेन आता चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer Vacation) सुरु होत आहेत. या काळात प्रवासी मोठ्या संख्येने वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी पसंती देतील, असा रेल्वेचा अंदाज आहे. यातून आणखी मोठ्या प्रमाणात रेल्वेला उत्पन्न मिळू शकते.