भारत सरकार मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेनचे (Vande Bharat Train) जाळे संपूर्ण देशात विस्तारत आहे. केंद्र सरकारकडून पुढील 3 वर्षात 400 वंदे भारत ट्रेन्स देशभरात चालवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. कमी वेळेत प्रवास आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकारने नव्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली आहे. आपण हिला ‘सेमी हायस्पीड ट्रेन’ या नावाने देखील ओळखतो.
आता दिल्ली ते भोपाळ (Delhi to Bhopal) हा प्रवास नव्या वंदे भारत ट्रेनने प्रवाशांना करता येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आणि तिकिटाचा दर आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन
1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM. Narendra Modi) सकाळी 10 वाजता भोपाळला पोहोचणार आहेत. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून दिल्लीसाठी नवी वंदे भारत ट्रेन दुपारी 3 वाजता रवाना केली जाणार आहे. या ट्रेनला नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रवासी यातून दिल्लीसाठी प्रवास करू शकतील. नवी वंदे भारत ट्रेन इकोनॉमीसोबत पर्यटनालाही चालना देण्यासाठी मदत करेल.
नव्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक काय असेल?
दिल्ली ते भोपाळ हे अंतर 708 किमी आहे. नव्या वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास केवळ 7. 45 तासात पूर्ण करता येणार आहे. भोपाळवरून सकाळी 5. 55 मिनिटांनी ही ट्रेन सुटेल,जी आग्रा (Agra) येथे 11.40 मिनिटांनी पोहचेल आणि त्यानंतर नवी दिल्लीसाठी रवाना होईल.
नवी दिल्लीला ही ट्रेन दुपारी 1. 45 मिनिटांनी पोहचेल. नवी दिल्ली हे या रूटचे अंतिम स्थानक असेल. हीच ट्रेन थोड्या वेळच्या विश्रांतीनंतर परत भोपाळसाठी रवाना होईल. दुपारी 4.45 मिनिटांनी ही ट्रेन आग्रा स्थानकावर पोहचेल आणि त्यानंतर रात्री 10. 45 मिनिटांनी भोपाळ स्थानकावर हजेरी लावेल.
जाणून घ्या तिकिटाचा दर
दिल्ली ते भोपाळ या मार्गावर शताब्दी ट्रेन (Shatabdi Train) चालवली जाते. यापुढे शताब्धी ट्रेनच्या जोडीला वंदे भारत ट्रेनने (Vande Bharat Train) प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. वंदे भारत ट्रेन या मार्गावर 160 किमी वेगाने धावेल. शताब्धी ट्रेनच्या तुलनेत वंदे भारत ट्रेनचे तिकीट हे 10 ते 15 टक्क्यांनी महाग असेल, मात्र या ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधाही मिळणार आहेत. या ट्रेनमध्ये एसी चेअर कारसाठी 1,420 रुपये तिकीट असेल, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,630 रुपये मोजावे लागणार आहेत.