मुंबईची लोकल ट्रेन आणि मुंबई शहर यांचं एक अतूट नातं आहे. लोकल ट्रेन शिवाय मुंबईची कल्पना करणे अनेकांसाठी अवघड बाब ठरू शकते. परंतु आता मुंबईची लोकल ट्रेन इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. कारण रेल्वे मंत्रालयाने मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला (MRVC) 238 आधुनिक ‘वंदे भारत’ ट्रेन मिळविण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ येत्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनची जागा वंदे भारत मेट्रो ट्रेन घेणार आहे.
Table of contents [Show]
मुंबईची ओळख, लोकल ट्रेन
मुंबई शहराची खास ओळख म्हणून मुंबईची लोकल ट्रेन ओळखली जाते. देशोविदेशातून मुंबई फिरायला आलेले लोक लोकलची सफर करण्यासाठी उत्सुक असतात. नोकरीनिमित्त, काम-धंद्यासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा मुंबई लोकल हा आवडीचा, खिशाला परवडणारा आणि वेळेची बचत करणारा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या या मुंबई लोकल ट्रेन लवकरच भूतकाळात जमा होणार आहे.
गेल्या शुक्रवारी रेल्वे बोर्डाने उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण बनवण्यासाठी सुमारे 238 वंदे भारत मेट्रो ट्रेन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारी वृत्तसंस्था असलेल्या पीटीआयने, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (MRVC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
‘मेक इन इंडिया’चा नारा
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनची जागा घेणाऱ्या वंदे भारत मेट्रो गाड्या खास देशी बनावटीच्या असणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाअंतर्गत या विशेष गाड्या बनवल्या जाणार आहेत. तसेच 35 वर्षांच्या देखभाल करारासह (Maintenance Contract) या गाड्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या ताफ्यात जमा होणार आहेत.
Say goodbye to Mumbai's crowded local trains! The Railway Board has approved the procurement of 238 Vande Bharat Metro trains, enhancing the suburban railway network's capacity. #Mumbai #VandeBharatMetro #RailwayBoard
— Newzera (@newzeraapp) May 22, 2023
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट
मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि आल्हाददायक व्हावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या पुढाकाराने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आखला गेला आहे. शासनाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) प्रकल्पांतर्गत तयार केले जातील, ज्याचे नेतृत्व रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार करत आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट MUTP-III आणि MUTP-3A या प्रकल्पांची किंमत अनुक्रमे ₹ 10,947 कोटी आणि ₹ 33,690 कोटी इतकीआहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेन
लोकल ट्रेनची जागा घेणाऱ्या वंदे भारत मेट्रो ट्रेन या ‘वंदे भारत एक्सप्रेसची मिनी आवृत्ती असेल असे बोलले जात आहे. देशांतर्गत 100 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. नागरीकांचा या ट्रेनला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सध्या महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर 'वंदे भारत' ट्रेन धावत आहेत.
सामान्य एक्सप्रेसच्या तुलनेत वंदे भारत ट्रेनचे भाडे अधिक आहे. असाच अनुभव येत्या काळात मुंबईकरांना वंदे भारत मेट्रो ट्रेनने प्रवास करताना घ्यावा लागू शकतो. या ट्रेन वातानुकुलीत असल्याने त्याचा देखभाल खर्च देखील अधिक आहे. तसेच मुंबईची गर्दी लक्षात घेता या गाड्यांनी प्रवास करणे आणि गाड्यांची देखभाल करणे हे मोठे आव्हान मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनसमोर असणार आहे.