भारतीय रेल्वेला (Indian Railways) येणाऱ्या वर्षांमध्ये तब्बल 1,00,000 किलोमीटरचे नवीन रेल्वेमार्ग (Railway Lines) उभारायचे आहेत. आणि त्यासाठी 25 वर्षांचं उद्दिष्ट ठेवण्याचीही रेल्वेची तयारी आहे. हे नेटवर्क अत्याधुनिक (Modernisation) असेल आणि त्यामुळे रेल्वेचा वेग वाढेल असं उद्दिष्टंही ठेवण्यात आलंय. भारतीय रेल्वेकडून 2023-24 साठीच्या अर्थसंकल्पात तसा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचं समजतंय.
आगामी अर्थसंकल्पात 7,000 किलोमीटरच्या मार्गाचं विद्युतीकरण (Electrification) करण्यासाठी 10,000 कोटी रुपये बाजूला काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशात नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी भारतीय रेल्वेनं यापूर्वीच आपलं व्हिजन डॉक्युमेंट (Vision Document) जारी केलं आहे. त्यानुसार, येत्या 25 वर्षांत देशात सर्वदूर रेल्वे पोहोचवण्याचं रेल्वेनं ठरवलं आहे. आता 2024 मध्ये यातल्या 4,000 किलोमीटर लांबीचे ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. नवीन रेल्वे मार्ग उभारण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात असेल असा अंदाज आहे.
आताच्या बाजारपेठेचा अंदाज घेतला तर 1,00,000 किलोमीटरचे रेल्वे मार्ग उभारण्यासाठी 15-20 ट्रिलियन रुपयांची गरज भासेल. आणि म्हणून टप्प्या टप्प्याने हे काम हाती घेण्यात येणार आहे. नवीन सुरू करण्यात आलेल्या अती-जलद (High-Speed) व मध्यम-जलद (Semi-Speed) जशा की वंदे भारत एक्स्प्रेस यांची वाहतूक सुरळीत होऊ शकेल अशा दर्जाचे रेल्वे ट्रॅक रेल्वेला उभारायचे आहेत.
आगामी अर्थसंकल्पातही 300 ते 400 नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा होऊ शकते. येणाऱ्या वर्षांमध्ये 160-180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची रेल्वेची महत्त्वाकांक्षा आहे. तसं झालं तर कार्गो महसूलही वाढू शकेल. पुढच्याच वर्षी 8.5-10% इतकी कार्गो वाहतूक वाढेल असा अंदाज आहे.
त्या प्रमाणात रेल्वेचा महसूलही वाढू शकेल. 2021-22 मध्ये भारतीय रेल्वेचा कार्गो महसूल 13,560 कोटी रुपये इतका होता. आणि त्यामध्ये 11%ची वाढ पाहायला मिळाली.