निवृत्तीनंतरच्या आर्थिक भविष्याचे नियोजन करताना राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टिम ही एक पेन्शन स्कीम आपल्यासमोर येते. ही स्कीम NPS म्हणून ओळखली जाते. ही स्कीम नेमकी काय आहे, तिचे स्वरूप कसे आहे ते सर्व जाणून घेऊया.
निवृत्तीनंतरच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेचा विचार केला जातो. दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा एक आकर्षक पर्याय मानला जातो. यामध्ये NPS Tier 1 आणि NPS Tier 2 असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
2004 मध्ये NPS या स्कीम ची सुरुवात झाली. सुरुवातीला ही स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली होती. 2009 पासून राष्ट्रीय पेन्शन योजना सर्वांसाठी खुली झाली. वय वर्षे 18 नंतर 70 वर्षेपर्यंत यात कुणीही गुंतवणूक करू शकतो. 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 60 टक्के रक्कम काढता येते तर 40 टक्के रक्कम ही पेन्शन स्वरूपात दिली जाते.
तुमच्या सोयीनुसार तुम्ही यात पैसे गुंतवू शकता. राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ( NPS ) च्या तुमच्या खात्यात दर महिन्याला किंवा वार्षिक पद्धतीनेही तुम्ही पैसे जमा करू शकता. या स्कीममध्ये 1 हजार रुपयामध्ये खाते उघडले जाऊ शकते. हे खाते साठाव्या वर्षी मॅच्युअर होते . पण यापुढेही ही स्कीम तुम्हाला चालू ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजना आणखी पाच वर्षे वाढवू शकता.
कशात गुंतवली जाते NPS मधील रक्कम
NPS ही मार्केट लिंक स्कीम आहे. इक्विटी, गव्हरमेंट डेब्ट, कार्पोरेट डेब्ट यामध्ये पैसे गुंतवले जातात. याचे प्रमाण काय असावे ते ठरवण्याची सुविधा देखील गुंतवणूकदाराला या योजनेत मिळते. किवा तुम्हाला जर हे ठरवायचे नसेल तर ऑटो ऑप्शन देखील स्वीकारता येतो. इक्विटीमध्ये जास्तीत जास्त किती गुंतवावी याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. यामुळे जोखीम नियंत्रित होण्यास मदत होते.
पेन्शन सुरू ठेवण्याविषयी नॉमिनीला घेता येतो निर्णय
एखाद्याने NPS Scheme मध्ये सहभाग घेतला आणि मध्येच मृत्यू झाला नॉमिनीला या योजनेचे सर्व लाभ मिळतात . खात्यातून पैसे पूर्ण काढता येतात किवा पेन्शनचा लाभ घ्यायचा असे सर्व निर्णय त्याला घेता येतात. मात्र याठिकाणी सुद्धा तोच नियम लागू होतो. जर 5 लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक असेल तर नॉमिनीला देखील 60 टक्केच रक्कम काढता येते. बाकी रक्कम पेन्शन फंडमध्ये जमा होते.
नॅशनल पेन्शन सिस्टीम ( NPS) ही पेन्शन स्कीम लोकप्रिय होत आहे. तुमच्या आर्थिक गरजा, मिळू शकणारा परतावा याचा सारासार विचार करून या योजनेचा विचार करणे योग्य ठरते.