गरोदर महिलेला आणि बाळंत झालेल्या महिलेला विशेष काळजीची आवश्यकता असते. सकस आहार, वैद्यकीय सेवा, औषधांचा खर्च आदी गोष्टींसाठी पैसे लागतातच. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने गरोदर महिलांसाठी एक खास योजना आणली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने सुरु केलेला एक विशेष उपक्रम आहे. या योजनेद्वारे गरोदर महिलेला आर्थिक मदत देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य थेट गरोदर महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार असून, संबधित महिला आवश्यकतेनुसार या पैशांचा वापर करू शकणार आहे.
5,000 रुपये अर्थसहाय्य
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत (PMMVY) गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे थेट गरोदर महिलेच्या बँक खात्यावर जमा होतात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात.
पहिला हप्ता: 1000 रुपये, गरोदरपणाच्या नोंदणीच्या वेळी
दुसरा हप्ता: 2000 रुपये, लाभार्थी महिला गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेत असेल तेव्हा दिले जाते.
तिसरा हप्ता: 2000 रुपये, जेव्हा नवजात बालकाच्या जन्माची नोंदणी केली जाते आणि बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस-बी सह लसींचा पहिला डोस दिला जातो.
Anganwadi workers have played a critical role in effective implementation of Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) specially during the pandemic. AWW workers in Kerala helped a young lady Jittu Thomas receive financial support under PMMVY for a healthy & happy pregnancy. pic.twitter.com/d8mvjIZpS3
— Smriti Z Irani (@smritiirani) March 25, 2022
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
गरीब, होतकरू आणि कष्टकरी महिलांसाठी मुख्यत्वे ही योजना आहे. ज्या महिला सरकारी किंवा खासगी कंपनीत पे रोलवर काम करतात अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. ज्या महिला असंघटीत कामगार आहेत आणि कष्टाचे काम करतात अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. गरोदरपणात त्यांचे कष्ट कमी व्हावेत आणि नवजात बालक सुदृढ जन्माला यावे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ केवळ पहिल्या बाळंतपणासाठीच मिळतो, तसेच बाळ जिवंत असेल तरच हप्त्यांमध्ये या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.
अर्ज कसा आणि कुठे कराल?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा (PMMVY) लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेला गावातील अंगणवाडी केंद्राला भेट द्यावी लागेल. या योजनेसाठीचे अर्थ अंगणवाडीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. योजनेचे तीन हप्ते मिळवण्यासाठी तीन वेगवेगळे अर्ज करावे लागतील.
योजनेच्या पहिल्या हप्त्याचा दावा करण्यासाठी फॉर्म 1A भरावा लागेल. यात गरोदर महिलेला माता बाळ संरक्षण कार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड, पतीची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थीच्या बँक खात्याची किंवा पोस्ट ऑफिस खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. याच खात्यावर आर्थिक सहाय्य दिले जाते.
योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी फॉर्म 1B भरावा लागेल.गर्भधारणा झाल्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच तपासणीची नोंद माता बाळ संरक्षण कार्डावर असणे आवश्यक आहे.
योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी फॉर्म 1C भरावा लागेल.यासाठी नवजात बालकाची जन्म नोंदणीची प्रत तसेच लसीकरणाचा पहिला डोस दिल्याची नोंद माता बाळ संरक्षण कार्डावर असणे आवश्यक आहे.
कागदपत्रांची पूर्तता वेळेत केल्यास लाभार्थ्यांना वेळेत या योजनेचा लाभ मिळू शकतो. अधिक माहितीसाठी गावातील अंगणवाडी केंद्राला किंवा महिला व बाल विकास केंद्राला भेट द्या.