Zerodha Mutual Fund: झिरोधा ब्रोकरेज कंपनीने शेअर मार्केटच्या खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मसोबतच आता म्युच्युअल फंड क्षेत्रात पाऊल टाकले आहे. झिरोधाने आपल्या ओपनिंगलाच दोन फंड लॉन्च केले आहेत. झिरोधा ईएलएसएस टॅक्स सेव्हर निफ्टी लार्ज मिडकॅप 250 इंडेक्स फंड आणि झिरोधा निफ्टी लार्ज मिडकॅप 250 इंडेक्स फंड असे दोन एनएफओ (New Fund Offer-NFO) शुक्रवारी (दि. 21 ऑक्टोबर) लॉन्च केले आहेत. हे एनएफओ 3 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुले असणार आहेत.
झिरोधाचा हा टॅक्स सेव्हर फंड ओपन एंडेड फंड असून तो निफ्टीच्या लार्ज मिडकॅप 250 इंडेक्सला ट्रॅक करत आहे. हा ईएलएसएस (ELSS) कॅटेगरीतील फंड आहे. याला 3 वर्षांचा लॉक-इन पिरिअड आहे. गुंतवणूकदार या स्कीमच्या मदतीने इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवू शकतात.
ईएलएसएस फंड म्हणजे काय?
टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेविंग फंड (ELSS) हे इतर म्युच्युअल फंडप्रमाणेच टॅक्स बचतीसह चांगले रिटर्न्स देतात. या फंडचे वैशिष्ट्य म्हणजे कर बचत म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. या फंडमधील गुंतवणूक वेगाने वाढ होणाऱ्या इक्विटी मार्केटमध्ये केली जाते.
तर झिरोधा निफ्टी लार्ज मिडकॅप फंडचे लक्ष्य हे निफ्टी लार्ज मिडकॅप 250 फंड असणार आहे. या फंडमध्ये जमा होणारा निधी इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सेक्टरमध्ये गुंतवला जाणार आहे. या दोन्ही स्किमवर गुंतवणुकीसाठी कोणताही एण्ट्री आणि एक्झिट लोड आकारला जाणार नाही. म्हणजे या फंडामध्ये गुंतवणूक करताना कोणतेही चार्जेस गुंतवणूकदारांना द्यावे लागणार नाहीत. याचे फंड मॅनेजर म्हणून केदारनाथ मिरजकर यांच्याकडे जबाबदारी आहे.