कर वाचवण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतात. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि दरवर्षी कर भरत असाल तर नक्कीच गुंतवणूक करून काही रक्कम भविष्यासाठी सेव्ह करण्याचा विचार तुमच्या डोक्यात आला असेल. क्विविटी लिंक्ड सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत करातून सूट मिळवू शकता. सेक्शन 80C अंतर्गत तुम्हाला ही सूट मिळते. त्यामुळे ELSS मध्ये गुंतवणूक केल्याने तुमचे गुंतवणूकही होईल आणि करही वाचेल.
ELSS काय आहे?
ELSS ही एक म्युच्युअल फंड स्कीम असून प्रामुख्याने इक्वीटीमध्ये गुंतवणूक करते. इक्विटीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीड लाख रुपये रकमेवरील कर वाचवू शकता. त्यामुळे तुमचा सुमारे ४६,८०० रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकता. मात्र, तुम्ही कोणत्या टॅक्स स्लबमध्ये येता यावर हे अवलंबून आहे. त्यानुसार तुम्हाला करात सूट मिळेल. याचाच अर्थ असा की, तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये ELSS योजनेत गुंतवून जास्तीत जास्त ४६ हजार ८०० रुपये वाचवू शकता. कमीत कमी ५०० रुपयेही तुम्ही या योजनेत गुंतवू शकता.
ELSS मध्ये गुंतवणूक करण्याआधी या बाबींकडे लक्ष द्या
ELSS योजनेत गुंतवणूक केलेल्या पैशाना तीन वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. म्हणजे तीन वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. ELSS योजनेतून खात्रीशीर चांगला परतावा मिळेल याची शाश्वती नाही. मार्केट लिंक्ड योजना असल्याने बाजारानुसार त्यात चढउतार होत राहतील. जर तुम्ही दीर्घकाळ म्हणजे ५ वर्षांपेक्षा जास्त काळ पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
ELSS मध्ये गुंतवणूकीचे पर्याय कोणते
या योजनेमध्ये तुम्ही SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन अंतर्गत दर महिन्याला ठराविक रक्कम योजनेत गुंतवू शकता. ज्यावेळी बाजार तेजीत असतो त्यावेळी तुम्ही जास्त युनिट खरेदी करू शकता आणि जेव्हा बाजारात मंदी असेल तेव्हा तुम्ही कमी युनिट खरेदी करू शकता.
तुम्ही जर जास्त धोका पत्करण्यास तयार असाल तर तुम्ही एकरकमी ELSS फंडात गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्हाला ही रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवून ठेवण्याचीही तयारी ठेवावी लागेल. त्यानंतरच चांगला परतावा मिळू शकेल. एक रकमी गुंतवणूकीचा पर्याय सहसा फायद्याचा ठरत नाही.
इतर योजनांपेक्षा जास्त परताव्याची शक्यता
जर तुम्ही कर वाचवण्यासाठी टॅक्स सेव्हर फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याच्या पर्यायावर विचार करत असाल तर तुम्हाला यापेक्षा ELSS मधून जास्त परतावा मिळू शकतो. तसेच मुदत ठेवीपेक्षा ELSS चा लॉक इन पिरियड तुलनेने कमी आहे. मुदत ठेव योजनेमध्ये कमीत कमी लॉक इन पिरियड ५ वर्षांचा आहे. तर ELSS मध्ये ३ वर्षांचा आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेतील गुंतवणूकीपेक्षा जास्त परतावा तुम्हाला ELSS मधून मिळू शकतो.