जगातील वादग्रस्त आणि प्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क याने अनेक वादविवादानंतर 44 बिलिअन डॉलरला ट्विटर कंपनी खरेदी केली आणि अपेक्षेनुसार इलॉन मस्के एक-एक रंग दाखवण्यास सुरूवात केली. सर्वप्रथम मस्कने ट्विटरचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह इतर 4 टॉप अधिकाऱ्यांना फायर केले. त्यानंतर ट्विटरचे संचालक मंडळही (Board of Director) बरखास्त केले. आता इलॉन मस्कने ट्विटरवरील Blue Tick युझर्सकडून महिन्याला 8 डॉलर्स म्हणजे सुमारे 650 रूपये सब्स्किप्शन चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद हा अनेक महिन्यांपासून सुरू होता. त्यातून ट्विटरच्या संचालक मंडळाशी इलॉन मस्कचे अनेकवेळा खटके उडाले होते. आता तर इलॉन मस्कने ट्विटर कंपनी खरेदी केली. त्यामुळे असे वाद संपतील, अशी अपेक्षा होती. पण इलॉन मस्ककडून आता ट्विटरबाबत नवनवीन घोषणा होत आहेत. त्यात मस्कने व्हेरिफाय ट्विटर अकाऊंट्ससाठी प्रत्येक महिन्याला 8 डॉलर्स (650 रुपये) चार्ज करण्याचा निर्णय ट्विटरद्वारे जाहीर केला. यापूर्वी ट्विटरवर व्हेरिफाय अकाऊंट करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जात होता. त्यात काही युझर्सकडून ठराविक प्रीमिअम चार्ज करून त्याचे अकाऊंट व्हेरिफाय केले जात होते. तर दुसऱ्या पद्धतीत एका ठराविक संख्येत युझर्सचे फॉलोअर्स असतील तर ट्विटर विनामूल्य त्यांचे अकाऊंट व्हेरिफाय करून देत होते. पण आता सरसकट सर्वच व्हेरिफाय खात्यांना प्रत्येक महिन्याला 650 रुपये ट्विटरच्या सब्स्क्रिप्शनसाठी खर्च करावे लागणार आहेत.
इलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर 4 दिवसांनंतर व्हेरिफाय खात्यांसाठी ट्विटर 20 डॉलर चार्ज घेणार अशा बातम्या येत होत्या. या बातम्यांवर इलॉन मस्कने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज इलॉन मस्कने स्वत: ट्विट करत घोषणा केली आहे की, सर्व Blue Tick युझर्सना प्रत्येक महिन्याला 8 डॉलर्स म्हणजे 650 रूपये सब्स्किप्शन चार्ज द्यावा लागणार आहे.
2021च्या आकडेवारीनुसार ट्विटरवर सुमारे 4 लाख व्हेरिफाय युझर्स आहेत. या युझर्सची संख्या लक्षात घेता ट्विटरला नवीन नियमानुसार प्रत्येक महिन्याला 26 कोटी रुपये व्हेरिफाय अकाऊंट्स होल्डरकडून मिळणार आहेत. तर प्रत्येक वर्षी या युझर्सकडून 312 कोटी रुपये मिळणार आहेत. अर्थात ट्विटरच्या या नवीन नियमामुळे काही व्हेरिफाय अकाऊंट्स कमी होण्याची किंवा काही अकाऊंट्स वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.अर्थात ट्विटरच्या व्हेरिफाय अकाऊंट्समध्ये वाढ झाल्यास इलॉन मस्कच्या प्रॉफिटमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की! Elon Muskने ट्विटरच्या डीलसाठी 44 बिलिअन डॉलर्स मोजले आहेत. अर्थात यासाठी इलॉन मस्कने आर्थिक तरतूद केली असेल. पण हा खर्च भरून काढण्यासाठी इलॉन मस्कने Blue Tick युझर्सकडून 8 डॉलर चार्ज करण्याची योजना आखली असेल.