भारताचा मित्र देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ या देशात सध्या भारतीय चलन घेण्यास तेथील व्यापारी नाक मुरडताना दिसत आहेत. एवढेच नाही तर नेपाळमधील सरकारी कार्यालयांपासून ते सामान्य किराणा दुकानांपर्यंत भारतीय चलन तेथील दुकानदारांनी घेणे बंद केले आहे. दुकानांमध्ये आणि पेट्रोल पंपावर तसे बोर्ड लावण्यात आले आहेत. नेपाळमध्ये भारतीय चलन घेऊन गेलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे.
मिळतोय कमी भाव
सध्या 100 रुपयांच्या भारतीय नोटेच्या बदल्यात 160 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र नेपाळ मधील काही व्यावसायिक 120-130 रुपये देताना दिसत आहेत. तसेच 500 भारतीय रुपयांच्या बदल्यात 800 नेपाळी रुपये मिळणे अपेक्षित असताना 700-750 नेपाळी रुपये बदलून दिले जात आहेत. नेपाळ मधील व्यावसायिकांना अचानकपणे असा निर्णय घेतल्यामुळे सामान्य भारतीयांना मात्र नाईलाजाने कमी पैसे घ्यावे लागत आहेत.
भारतीय रुपयावर बंदी?
नेपाळमधील दुकानांमध्ये, पेट्रोल पंपावर भारतीय रुपये स्वीकारले जाणार नाहीत अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. याबाबत नेपाळ सरकारने कुठलेही अधिकृत निवेदन प्रकाशित केलेले नाही, तरीही व्यापारी अशी भूमिका का घेत आहेत याची विचारणा नागरिकांकडून केली जात आहे. नेपाळमध्ये भारतीय चलन व्यवहारात आहे म्हणून अनेक लोक चलन बदल न करता भारतीय चलन घेऊन नेपाळमध्ये जात असतात. पशुपतीनाथ व इतर धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक नेपाळ येथे जात असतात. भारतीय चलन घेऊन नेपाळमध्ये गेलेल्यांना आता अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
नोटबंदीनंतर वाढल्या समस्या
2016 साली भारतात 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या होत्या. त्यामुळे नेपाळमध्ये असलेल्या भारतीय चलनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनतर काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमधील व्यापाऱ्यांनी या नोटा घेणे टाळले असून आता तर सर्वच भारतीय नोटा घेण्यास टाळाटाळ करत आहेत.