देशातील गहू आणि पिठाच्या किमती रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशात गव्हाचा दर 3000 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेला आहे, तर पीठही 40 रुपये प्रति किलो (Atta Price) वर पोहोचला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे आता लोकांना बाजारभावापेक्षा सुमारे 11 रुपयांनी स्वस्त पीठ मिळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून, नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड (NCCF) स्वस्त पिठाची विक्री सुरू करणार आहेत.
एका अहवालानुसार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव (DFPD) संजीव चोप्रा यांनी सांगितले की, हा निर्णय सामान्य लोकांना स्वस्तात पीठ मिळावे म्हणून घेण्यात आला आहे. नाफेड आणि एनएफसीसी त्यांच्या वेगवेगळ्या आउटलेटद्वारे 29.50 रुपये प्रति किलो दराने देशभरात पीठ विकणार आहेत. हे पीठ विविध किरकोळ दुकाने, मोबाईल व्हॅन आदींमधून स्वस्त दरात विकले जाईल. या संस्था ‘भारत आटा’ या नावाने गव्हाचे पीठ विकतील.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI), केंद्रीय भंडार, नॅशनल ऍग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन लिमिटेड (NCCF) यांच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत, या संस्था 3 लाख मेट्रिक टन गव्हाची उचल करतील असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय भंडारने यापूर्वीच 29.50 रुपये किलो दराने पीठ विकण्यास सुरुवात केली आहे. नाफेड आणि NFCC 6 फेब्रुवारीपासून या दराने पीठ पुरवठा सुरू करतील.
राज्य संस्थांना स्वस्तात मिळणार पीठ
राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील कोणतीही महामंडळ/सहकारी संस्था/महासंघ किंवा स्वयंसहाय्यता गट केंद्र सरकारकडून 23.50 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करू शकतात असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तर ग्राहकांना 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाचे पीठ खरेदी करता येणार आहे. बैठकीमध्ये FCI द्वारे अवलंबलेल्या सामान्य प्रक्रियेनुसार ई-लिलावाद्वारे व्यापारी, पीठ गिरण्या इत्यादींना केंद्रीय भांडारमधून 25 लाख मेट्रिक टन गहू विकण्यासही मान्यता देण्यात आली.