Wheat Prices in India: केंद्र सरकार गहू आणि पिठाच्या किमती कमी करण्यासाठी अनेक विशेष योजना करत आहे. खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पीठ गिरण्यांच्या शिखर संघटनेने स्वागत केले आहे. पिठाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाच्या दरात किलोमागे पाच ते सहा रुपयांची घसरण होणार आहे.
किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय
गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली होती. हा साठा पुढील दोन महिन्यांत विविध माध्यमांद्वारे सरकारी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) द्वारे विकला जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा योजना आणि इतर कल्याणकारी योजनांची पूर्तता केल्यानंतर उरलेला अतिरिक्त गहू विक्रीसाठी आणला जाणार आहे. त्यामुळे गव्हाच्या वाढत्या किमती आटोक्यात येतील आणि साठेबाजी करणाऱ्यांना देखील चाप लागेल.
ई-लिलावाद्वारे होणार गव्हाची विक्री
पीठ गिरणी मालकांसारख्या घाऊक व्यापाऱ्यांना ई-लिलावाद्वारे गहू कुठे आणि कधी विकला जाईल हे आगोदरच कळविण्यात येणार आहे. त्याच वेळी, FCI कमाल ( MRP) 29.50 रु. दराने सामान्य नागरिकांना दळलेले पीठ मिळावे यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स/सहकारि संघ, केंद्रीय भंडार/NCCF/नाफेड यांना 23.50 रु.दराने गहू विकणार आहे.
Wheat prices have hit an all-time high. What can the government do to bring prices down? @Manisha3005 explains ?#Wheat #WheatPrices pic.twitter.com/O1FiWAyncm
— Moneycontrol (@moneycontrolcom) January 23, 2023
सरकारच्या निर्णयाचे स्वागत
रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडिया (RFMFI) चे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी पीटीआयला सांगितले की आम्ही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत आहे. हा निर्णय महिनाभर आधी घ्यायला हवा होता असेही त्यांनी म्हटले आहे.या निर्णयामुळे घाऊक आणि किरकोळ किंमती लवकरच 5 ते 6 रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतील.
गव्हाचा भाव किती?
सरकारी आकडेवारीनुसार, प्रमुख शहरांमध्ये बुधवारी गव्हाची सरासरी किंमत 33.43 रुपये प्रति किलो होती, जी गेल्या वर्षी 28.24 रुपये प्रति किलो होती. गव्हाच्या पिठाची सरासरी किंमत 37.95 रुपये प्रति किलो इतकी नोंदवली गेली, जी गेल्या वर्षी याच वेळी 31.41 रुपये प्रति किलो होती.