Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Good Financial Behaviour: निवृत्तीनंतर चांगले जीवन जगाचंय; मग त्याचे नियोजन आतापासूनच करा!

Good Financial Behaviour for Early Retirement plan

Good Financial Behaviour: प्रत्येकाला आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर निवृत्त व्हावे लागते. प्रत्येकाच्या निवृत्तीचा काळ हा वेगवेगळा असतो. पण तो ठरवताना मात्र उतारवयाला पुरेल अशी पुंजी जमा करूनच निर्णय घ्यायला हवा. यासाठीचा स्मार्टनेस आताच म्हणजे नोकरीची सुरूवात होताच निवृत्तीचे नियोजन करून दाखवायला हवा.

निवृत्तीचे नियोजन ही जरी उतारवयातील तरतूद असली तरी तिचा उत्साह हा तरूणापणातच दाखवावा लागतो. कारण तरूण वयातच नवनवीन गोष्टी स्वीकारण्याची त्यासाठी झगडण्यासाठी ईर्षा असते. हिच ईर्षा निवृत्ती नियोजनासाठी दाखवली तर तुम्ही तुमच्या उतारवयातील स्मार्ट तरूण ठराल. उतारवयातील नियोजन हे आयुष्यातील सर्व गोष्टी केल्यानंतर करण्याचे साधन नाही. तर ती सध्याच्या काळातील प्राथमिकता आहे. कारण पूर्वी बऱ्याच जणांना कंपन्यांकडून किंवा सरकारकडून पेन्शन मिळत होती. ती आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आपल्या पेन्शनची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागत आहे आणि त्यासाठी करावी लागणार तरतूद ही सुद्धा आपल्यालाच करावी लागत आहे. त्यामुळे यासाठी कोणाची वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नका. निवृत्ती वेतनाची सोय जितक्या उशीरा सुरू कराल तेवढा खर्च अधिक तर वाढेलच पण त्याचबरोबर उतारवयात बऱ्याच ठिकाणी आर्थिक दृष्ट्या तडजोडही करावी लागेल.

निवृत्ती नियोजन गरजेचे आहे का?

साधारणत: सर्व मध्यमवर्गीय घरात मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, बाळंतपणे अशी कर्तव्ये पूर्ण झाल्यावर स्वत:च्या भविष्याचा विचार करून निवृत्तीचे नियोजन करण्यास सुरूवात करू लागतात. पण तोपर्यंत बऱ्यापैकी वेळ आणि वय निघून गेलेली असते. अशावेळी नव्याने निवृत्तीचे नियोजन करणे हे मोठे आव्हानात्मक वाटू लागते. कारण नेमक्या याच वयात उत्साह कमी झालेला असतो. आर्थिक पुंजी कमी होऊ लागते. जबाबदाऱ्या दिवसागणिक वाढू लागतात. अचानक आजारपण आले तर कंबरडेच मोडण्याचे बाकी असते. या सर्वातून निश्चितपणे बाहेर पडण्यासाठी आणि भविष्यातील आर्थिक संकटांपासून मुक्त राहण्यासाठी तरूणवयात निवृत्ती नियोजन करणे गरजेचे आहे.

तरूणवयात निवृत्ती नियोजन कसे करावे?

समजा तुमचे वय 30 वर्षे आहे आणि तुम्ही एका नामांकित कंपनीत कामाला आहात. त्या कंपनीतून तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्ती व्हाल. म्हणजे तुमच्याकडे नोकरीची 30 वर्षे शिल्लक आहेत. आता तुमची लाईफस्टाईल म्हणा किंवा प्रत्येक महिन्याला तुमचा खर्च हा 50 हजार रुपये इतका आहे. निवृत्तीनंतरही तुम्ही साधारणपणे अशाच प्रकारचे आयुष्य जगणे पसंत कराल. मग यासाठी तुम्हाला 60व्या वर्षात प्रत्येक महिन्याला किमान 1.50  लाख रुपये लागतील. आता इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचे नियोजन आतापासूनच करावे लागेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

आपण निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी लागणारी जमापुंजी गोळा करण्यासाठी कोणत्या पेन्शन योजनांची मदत घेऊ शकतो. हे पाहणार आहोत. साधारणपणे राष्ट्रीय पेन्शन योजना, पारंपरिक रिटायरमेंट प्लॅन आणि पीपीएफ या योजनांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)

राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) ही एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे. म्हणजे या स्कीममध्ये जोखीम जास्त आहे. तसेच या योजनेमध्ये तुम्ही पर्यायांमधून एकाची निवड करून गुंतवणूक करू शकता. पहिली योजना आहे ती म्हणजे 75 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. दुसऱ्या पर्यायात सर्व पैसे कॉर्पोरेट बॉण्डमध्ये गुंतवू शकता आणि तिसऱ्या पर्यायात सरकारी रोखे (Govt Bonds) खरेदी करू शकता. या स्कीममध्ये वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की स्कीम मॅच्युर्ड होते. त्यावेळी एका ठराविक रक्कम लगेच मिळते. तर उर्वरित रक्कम पेन्शन स्वरूपात मिळते.

रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan)

सध्या सर्वच इन्शुरन्स कंपन्या टिपिकल रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan) देत आहेत. हे प्लॅन दोन प्रकारचे असतात. एक डिफर्ड अॅन्युइटी प्लॅन आणि दुसरा इमिडिएट अॅन्युइटी प्लॅन. यातील पहिला प्लॅन जर तुम्ही घेतला तर तुम्हाला निवृत्ती होईपर्यंत पैसे भरावे लागतात. तर दुसऱ्या म्हणजे इमिडिएट अॅन्युइटी प्लॅनमध्ये एकदाच ठराविक रक्कम भरावी लागते. अशाप्रकारच्या प्लॅनमध्ये पॉलिसीधारक सोयीनुसार एकरकमी किंवा प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवू शकतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

पीपीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) ही एक साधीसोपी योजना आहे. या योजनेतून गुंतवणूकदाराला 7-7.5 टक्के या दरम्यान रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. या योजनेचा सरकारकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. पीपीएफ मध्ये टाकलेले पैसे 15 वर्षानंतर मॅच्युअर्ड होतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 7 व्या वर्षी यातून पैसे काढता येतात. तसेच यावर कर्जही घेता येते.

उतारवयातील आयुष्याचे नियोजन करण्याचे पर्याय अनेक आहेत. फक्त तुम्ही या पर्यायांकडे कसे पाहता आणि लवकरात लवकर निवृ्त्तीसाठी गुंतवणूक कधी सुरू करता, यावर सारे निर्भर आहे. त्यामुळे स्मार्ट बना आणि तरूण वयातच निवृ्तीच्या तरतुदीची नियोजन सुरू करा.