कर बचतीचा (Tax Saving) फायदा आणि सरकारी योजना असल्यामुळे मिळणारी सुरक्षितता यामुळे PPF हे गुंतवणुकीचं साधन (Asset Class) गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लोकांची त्याला पसंती आहे. पण, एक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतो - नेमके किती पैसे PPF मध्ये गुंतवायचे?
PPF योजनेची वैशिष्ट्ये
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकर कायद्याच्या 80C कलमा अंतर्गत PPF मध्ये केलेल्या 1,50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करातून सूट मिळते. इतकंच नाही तर मिळणारा परतावाही करमुक्त असतो. फक्त यासाठी 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. म्हणजे या 15 वर्षांत तुम्हाला PPF मधून पैसे काढता येत नाहीत. तिथून पुढे तुम्ही दरवर्षी काही ठरावीक रक्कम PPF निधीतून काढू शकता. (अपवाद महत्त्वाची वैद्यकीय गरज) एका व्यक्तीचं एकच PPF खातं असू शकतं. आणि फक्त भारतीय नागरिकांनाच हे खातं उघडता येतं.
आणखी एक सुलभता यात आहे. एकदा PPF खातं उघडल्यानंतर तुम्ही वर्षाला किमान पाचशे रुपये भरून तुमचं खातं सुरू ठेवू शकता. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. गुंतवणुकीची वरची मर्यादा आहे दीड लाख रुपये .
PPF वरचा व्याजदर केंद्रसरकार ठरवतं. आणि आर्थिक वर्षाच्या तिमाहीला त्याचा फेरआढावा घेतला जातो. सध्याचा PPF व्याजदर 7.10% इतका आहे . आणि तो चक्रवाढ पद्धतीने लागू होतो.
मुदत ठेव विरुद्ध PPF
मुदत ठेव किंवा PPF यांच्यात तुलना करायची झाली तर गुंतवणुकीचं उद्दिष्टं आधी लक्षात घ्यावं लागेल. शिवाय तुमचं करदायित्व जास्त असेल तर तुमच्यासाठी PPF हाच पर्याय योग्य ठरेल. कारण, त्यामुळे तुम्हाला निदान दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर लागणार नाही.
याशिवाय मुदत ठेवींवर तुम्हाला 4 ते 7% पर्यंत व्याज मिळतं. तेच PPF वर 7 टक्क्यांच्या वरच व्याज मिळत आलं आहे. शिवाय त्याला कर बचतीचा फायदा आहे. बँक बुडली तर सगळ्याच मुदत ठेवींना संरक्षण नसतं. पण, PPF मधली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
PPF मध्ये किती पैसे गुंतवावे?
हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडे म्युच्युअल फंडासारखे चांगला परतावा देणारे पर्यायही उपलब्ध आहेत. असं असताना PPF मध्ये नेमके किती पैसे गुंतवावे असा प्रश्न गुंतवणूकदाराला नक्की पडतो. त्याचं एक गणित गुंतवणूक तज्ज्ञ देतात.
तुम्ही स्वत:साठी निर्धारित केलेलं आर्थिक उद्दिष्टं ही परताव्याची अपेक्षित रक्कम मानली जाते.
म्हणजे तुम्हाला पंधरा वर्षांनंतर मुलांचं शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी हाताशी पैसे हवे असतील. तर ते तुमचं गुंतवणुकीचं कारण. आणि जर जितके पैसे लागणार असतील ते उद्दिष्टं.
म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीवर जोखीम असते. त्यामुळे दीर्घ मुदतीची जीवनावश्यक उद्दिष्टं सुरक्षित पर्यायातून साध्य करावीत असा सल्ला नेहमी गुंतवणूक तज्ज्ञ देतात. अशावेळी एक उदाहरण घेऊया.
तुम्हाला पंधरा वर्षांनंतर 25 लाख रुपये लागणार असतील. तर सध्याच्या 7.1% चक्रवाढ व्याजाने तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील असं उलटं गणित तुम्हाला करायचं आहे. आणि त्या न्यायाने दरवर्षी 1 लाख रुपये PPF मध्ये गुंतवले तर 15 वर्षांनंतर तुम्हाला 27,12,139 इतका परतावा मिळू शकेल.
दुसरं म्हणजे वय वाढतं तसं गुंतवणुकीत जोखीम उचलण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा योग्य पर्याय मानला जातो.