सर्वसाधारणपणे वयाची 65-70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काहीजण नोकरीतून निवृत्ती घेतात अथवा काम करणे बंद करतात. अशावेळी निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगण्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. अनेकजण वृद्धापकाळात कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये म्हणून आधीपासूनच पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करतात. जेणेकरून, सेवानिवृत्तीनंतर त्यांना ठराविक कालावधीने नियमितपणे पैसे मिळत राहतील.
तुम्ही देखील निवृत्तीनंतरच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी व सुरक्षित भविष्यासाठी पेन्शन प्लॅन घेण्याचा विचार करू शकता. या लेखातून कोणते पेन्शन प्लॅन्स तुमच्यासाठी योग्य आहेत व यासाठी किती गुंतवणूक करावी लागते? याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सरकारी पेन्शन योजना
सरकारकडूनही वृद्ध नागरिकांसाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात. यापैकीच एक अटल पेन्शन योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनाचा लाभ घेऊ शकता. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहिन्याला 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी तुम्हाला 210 ते 1318 रुपये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री वय वंदन योजनेंतर्गत देखील वृद्ध नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधा उपलब्ध आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
कमी जोखीम व जास्त परतावा यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला सर्वाधिक पसंती दिली जाते. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकते. अनेकांना वाटते की केवळ नोकरी करणारेच हे खाते उघडू शकतात. मात्र असे नाहीये. या योजनेत तुम्ही एकरकमी किंवा दरमहिन्याला गुंतवणूक करू शकता. दरमहिन्याला फक्त 500 रुपये गुंतवणूक करण्याची देखील सुविधा यात मिळते.तर एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 15 वर्ष आहे.
तसेच, Employees’ Provident Fund (EPF) ही देखील एक सेवानिवृत्ती योजना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातील ठराविक रक्कम व तेवढीच रक्कम कंपनीकडूनही या खात्यात जमा केली जाते. निवृत्तीनंतर कर्मचारी ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.
ॲन्युटी प्लॅन्स
काही विमा कंपन्यांकडूनही वार्षिक पेन्शन योजना राबवल्या जातात. निवृत्तीनंतर दरमहिन्याला ठराविक रक्कम मिळावी अशी इच्छा असल्यास ॲन्युटी प्लॅन्स घेऊ शकता. या योजनेत तुम्ही एकरकमी अथवा दरमहिन्याला देखील गुंतवणूक करू शकता. तसेच, निवृत्तीनंतर मासिक, त्रैमासिक अथवा सहामाही अशा टप्प्यात पैसे मिळतील. तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहिन्याला किती पैसे हवे आहेत, त्यावरून गुंतवणुकीची रक्कम ठरते. तुम्ही कितीही मोठी रक्कम गुंतवू करू शकता.
जीवन विम्यासह येणारा पेन्शन प्लॅन
तुम्हाला जर पेन्शनसोबतच जीवन विमा देखील हवा असल्यास अशा प्लॅनचा विचार करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहिन्याला ठराविक रक्कम तर मिळेलच, सोबतच जीवन विम्याचा देखील यात समावेश असेल. तुम्ही भरलेल्या प्रीमियमची काही रक्कम पेन्शन फंडमध्ये जाते, तर काही रक्कम जीवन विम्यासाठी वापरली जाते. मॅच्युरिटीनंतर नियमितपणे पैसे मिळतात. समजा, या कालावधीत मृत्यू झाल्यास ही रक्कम नॉमिनीला मिळते. तुम्ही दरमहिन्याला 1 हजार अथवा 5 हजार रुपये गुंतवून देखील याची सुरुवात करू शकता.