Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple CEO Tim Cook Meets Narendra Modi : मोदींबरोबरच्या भेटीत ॲपल सीईओंनी भारतातल्या गुंतवणुकीविषयी काय सांगितलं?

Tim Cook and PM Narendra Modi's Meet

Image Source : www.twitter.com

Apple CEO Tim Cook Meets Narendra Modi : भारताच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाची सकारात्मक साथ असावी, या उद्देशाने या तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणं आणि उत्पादनाची निर्मिती करण्याचे आश्वासन टीम कूक यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या भेटी दरम्यान दिले.

Apple चे सीईओ Tim Cook हे सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपले पंतप्रधान Narendra Modi यांची काल भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही उभयतांमध्ये तंत्रज्ञानयुक्त भविष्य, भारताचा विकास, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी त्यांनी दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रोनिक्स आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांची सुद्धा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

नुकताच 18 एप्रिलला ॲपलने त्यांचं भारतातलं पहिलं रिटेल शॉप हे आर्थिक राजधानी मुंबईतल्या बीकेसी येथे सुरू केलं. तर आज 20 एप्रिलला राजधानी दिल्लीमध्ये दुसरं शॉप सुरू करणार आहे. या कार्यक्रमा निमित्ताने  टीम कुक हे गेल्या तीन दिवसापासून भारतात आहेत.

टीम कूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा

ॲपल कंपनीकडुन भारतामध्ये सध्या चांगल्या प्रकारे गुंतवणूक सुरू आहे. या गुंतवणूकीच्या प्रमाणामध्ये वाढ करणे, तसेच अधिकाधिक उत्पादनांची निर्मितीसुद्धा भारतातच कशाप्रकारे केली जाईल या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी कुक यांनी सुद्धा आपल्या कंपनीकडुन भारतामध्ये उत्पादन वाढवण्याचे आश्वासन दिले.

यासंदर्भात टीम कुक यांनी ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, भारताच्या विकासावर तंत्रज्ञानाचा सकारात्मक प्रभाव पडत आहे या तुमच्या मताशी मी सहमत आहे. असा हा तंत्रज्ञानयुक्त विकास साधण्यासाठी भारतातील शिक्षण, पर्यावरण आणि विशेषत: उत्पादन निर्मिती क्षेत्रातील विकास व गुंतवणूक यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असू.

टीम कुक यांच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, विविध विषयांवर तुमच्याशी चर्चा करताना आनंद झाला. तसेच भारत कशाप्रकारे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्षम होत आहे, यामध्ये कसे परिवर्तन होत आहे यावर सकारात्मक चर्चा झाली. 


भारतातील ॲपलचा व्यापार

भारतातील स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये ॲपलचा 6-7 टक्के शेअर आहे. गेल्या काही वर्षापासून फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रोन या कंपनीच्या मध्यस्थीने भारतामध्ये आयफोनचे असेंम्बलिंग व उत्पादन सुरू आहे. केंद्र सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन अनुदानामुळे (PLI) 2023 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 40 हजार कोटी आयफोनची निर्यात एकट्या भारतातून झाली आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कंपनीच्या माध्यमातून भारतात उत्पादन क्षेत्रामध्ये 10 हजार थेट रोजगार निर्मिती झाली असून यापैकी 70 टक्के कर्मचारी या महिला आहेत. अशी माहिती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दिल्ली येथील ॲपल स्टोअरचा शुभारंभ

मुंबई पाठोपाठ ॲपलने दिल्ली येथे भारतातले दुसरे रिटेल शॉप सुरू केलं आहे. आज या शॉपचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. दिल्लीतल्या साकेत येथे सिलेक्ट सिटी वॉक मॉल मध्ये हे शोरूम असणार आहे. 10 हजार स्क्वेअर फुटच्या एरियामध्ये हे शोरूम असणार आहे. आता दिल्लीवासियांना सुद्धा थेट ॲपल शॉपमधुन प्रोडक्ट खरेदी करण्याचा आनंद मिळणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून हे शॉप ग्राहकांसाठी खुलं होणार आहे.

टीम कूक यांचा भारत दौरा

टीम कुक यांनी कंपनीच्या कामानिमित्ताने नियोजित केलेल्या आपल्या भारत भेटी दरम्यान भारताच्या पर्यटनाचाही आनंद घेतला आहे. कुक यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांच्यासोबत मुंबईतल्या वडापावची चव घेतली. टेनिसपटू सायना नेहवाल, कोच गोपीचंद यांच्यासोबत उभारत्या खेळाडूंची भेट घेतली. किडोपिया या लहान मुलांना शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्थेला त्यांनी भेट दिली. त्यानंतर नादसाधना या AI तंत्रज्ञानावर आधारित म्यूझिक ॲपचे संस्थापक संदिप रानडे या संगितकाराची भेट घेत त्यांच्याकडून मिले जो सूर मेरा तुम्हारा या गीताचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी आकांक्षा फाऊंडेशनला भेट देत तेथील विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. अनेक मान्यवरांच्या संस्थांच्या भेटीसोबतच कुक यांनी आपल्या या दौऱ्यावेळी ‘द इंडियन स्कुल ऑफ डिझाईन ॲन्ड इनोवेशन’, दिल्लीस्थित ‘द लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट’, ‘नॅशनल क्राफ्ट म्यूझियम आणि हस्तकला अकादमी’ ला सुद्धा भेट देत भारताच्या सांस्कृतिक, कलेची ओळख करुन घेतली.