Apple या जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रॅंडच्या भारतातील पहिले एक्स्लुझिव्ह स्टोअर्सचे मुंबईत मंगळवारी 18 एप्रिल रोजी अनावरण होणार आहे. या निमित्ताने अॅपलचे सीईओ टीम कुक यांचे आज सोमवारी 17 एप्रिल रोजी मुंबईत आगमन झाले. टीम कुक हे ग्लोबल सीईओंमध्ये सर्वात जास्त पॅकेज घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहे. अॅपलकडून टीम कुक यांच्या वेतनात 40% कपात केली. मात्र तरिही वर्ष 2023 मध्ये टीम कुक यांचे एकूण पॅकेज 398 कोटी 75 लाख 75 हजार रुपये (49 मिलियन डॉलर्स) इतके होते. (Apple CEO Tim Cook's Annual Package)
टीम कुक मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये अॅपल स्टोअरचा शुभारंभ करणार आहेत. आज त्यांनी मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरला भेट दिली. भारतात मागील काही वर्षांत आयफोन आणि इतर अॅपलच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. आशियातील एक मोठी बाजारपेठ म्हणून भारत उदयास येत आहे. भारतात जवळपास 70 कोटी स्मार्टफोन्सधारक आहेत. त्यात अॅपलचा केवळ 4% वाटा आहे. त्यामुळे अॅपलने भारताकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
मागील वर्षभरात अॅपलच्या भारतातील विक्री महसुलात जवळपास 50% वाढ झाली. मार्चअखेर अॅपलला भारतातून 6 बिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 48000 कोटी) महसूल मिळाला. त्याआधीच्या वर्षात अॅपलने भारतातल्या विक्रीतून 4.1 बिलियन डॉलर्सचा महसूल मिळवला होता. अॅपलच्या एकूण महलुसात हा वाटा अवघा 2% आहे. मात्र भारतीय बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. मिलेनिअल्सची अॅपलच्या उत्पादनांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच इथल्या संधी हेरण्यासाठी अॅपलने थेट एक्स्लुझिव्ह स्टोअर्स सुरु करण्याचे ठरवले आहे.
मागील तीन वर्षांपासून भारतात अॅपलकडून आयफोन्स, आयपॅड्स आणि इतर गॅझेट्सची ऑनलाईन विक्री केली जाते. 2020 मध्ये अॅपलने ऑनलाईन स्टोअर सुरु केले होते. याशिवाय अॅमेझॉन आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अॅपलची उत्पादने विक्री केली जातात. भारतीयांचा आयफोनकडे वाढता प्रतिसाद पाहता कंपनीकडून थेट स्टोअर सुरु करण्याची स्ट्रॅटेजी केली आहे.आतापर्यंत अॅपल स्थानिक पातळीवर चॅनल पार्टनर किंवा फ्रॅंन्चाईज पार्टनरच्या माध्यमातून ग्राहकांना विक्री पश्चात सेवा देत होते. आता कंपनीचे एक्स्लुझिव्ह स्टोअर सुरु झाल्याने ग्राहकांना देखील थेट सेवा मिळणार आहे. यातील पहिले स्टोअर मंगळवारी मुंबईत कुक यांच्या हस्ते सुरु होणार आहे. त्यानंतर बुधवारी दिल्लीत अॅपलच्या स्टोअरचे अनावरण होईल.
Table of contents [Show]
मुंबईत टीम कुक यांनी घेतला वडपावचा आस्वाद
मुंबईत दाखल झालेल्या टीम कुक यांनी मुंबईचा फेमस वडपावचा आस्वाद घेतला. अभिनेत्री माधुरी दिक्षीत हिच्या सोबत टीम कुक यांनी वडापावचा आस्वाद घेतला. याबाबत कुक यांनी वडापाव खाल्ल्यानंतर ट्विट करुन मुंबईचे आभार मानले.
अॅपलसाठी भारत होणार मॅन्युफॅक्चरिंग हब
चीनमधून आयफोन निर्मिती कमी करुन ती भारतात शिफ्ट करण्याचा निर्णय अॅपलकडून घेण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतातील स्मार्टफोन निर्यातील अॅपलचा वाटा वाढत असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या काळात भारतातून जवळपास 9 बिलियन डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले. त्यात 50% अधिक मूल्य हे आयफोन्सचे होते. त्यामुळे अॅपलसाठी देखील भारत एक प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे.
टीम कुक यांच्या वेतनात मोठी कपात
अॅपलच्या व्यवस्थापनाने सीईओ टीम कुक यांच्या पगारात तब्बल 40% कपात केली आहे. वर्ष 2023 मध्ये कुक यांना 49 मिलियन डॉलर्सचे पॅकेज मिळाले. भारतीय चलनात ही रक्कम 398 कोटी 75 लाख 71 हजार रुपये इतकी होती. वर्ष 2022 मध्ये कुक यांना 99.4 मिलियन डॉलर्सचे वार्षिक पॅकेज मिळाले होते. भारतीय चलनात ही रक्कम 800 कोटींपेक्षा जास्त आहे. यात कुक यांना 3 मिलियन डॉलर्स इतके मूळ वेतन आणि 83 मिलियन डॉलर्सचे स्टॉक ऑप्शन मिळाले होते. वर्ष 2021 मध्ये कुक यांना एकूण 98.7 मिलियन डॉलर्सचे पॅकेज मिळाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
अॅपलचे सीईओ टीम कुक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. कुक भारत दौऱ्यावर आहेत. मुंबईत आणि दिल्लीत अॅपलचे प्रत्येकी एक स्टोअर त्यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे. त्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट घेतील, असे या वृत्तात म्हटले आहे.