Financial Freedom: सबंध देशभरात 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य तर मिळाले मात्र, अनेक नागरिक अद्यापही आर्थिक गुलामगिरीत आहेत. त्यामुळे या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करूया. आर्थिक नियोजन, कौटुंबिक जबाबदाऱ्या, जोखीम, निवृत्ती यांचे नियोजन कसे करावे यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.
आर्थिक ध्येय निश्चित करा
वयाच्या विविध टप्प्यांवर गरजा बदलतात. बॅचलर असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी असतात. मात्र, लग्न झाल्यानंतर मुलांचे शिक्षण, नवे घर, गाडी, विमा अशा अशा अनेक गोष्टी वाढतात. उतारवयात निवृत्तीनंतर उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कसा घालावा याची अनेकांना चिंता पडते.
तसेच या वेळी एखादा आर्थिक निर्णय चुकला तर आयुष्यभराची पुंजी गमावून बसावे लागल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे आहे. तुमचे आर्थिक ध्येय निश्चित करा. त्यासाठी किती पैसे लागतील अंदाज बांधा आणि गुंतवणूक, बचत करण्यास सुरुवात करा.
लवकर सुरुवात करा
जेवढे लवकरात लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल. जेवढा उशीर कराल तेवढे जास्त पैसे भविष्याच्या सुरक्षेसाठी गुंतवावे लागतील. मात्र, कमावत्या वयात इतर जबादराऱ्यांमुळे जास्त पैसे गुंतवणे शक्य होत नाही. त्यामुळे कॉलेज संपवून नुकतेच कमावायला लागला असाल तर लगेच पुढील नियोजनाला लागा. निवृत्तीसाठी तरुण वयापासून गुंतवणूक सुरू करा.
वायफळ खर्च टाळा
प्रत्येक व्यक्ती आनंदी राहण्यासाठी, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी नक्कीच खर्च करा. मात्र, गरज नसलेल्या गोष्टींवरील खर्च टाळा. शॉपिंग, महागडे गॅझेट्स, हॉटेलमधील जेवण अशा गोष्टींवर उत्पन्नातील मोठा हिस्सा खर्च होत राहतो. त्यावर आवर घाला.
तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी नक्कीच खर्च करा. मात्र, त्याची मर्यादा ठरवून घ्या. झालेला खर्च लिहून ठेवा. त्यासाठी फायनान्शिअल प्लॅनिंग अॅप किंवा साधी एक्सल शीट वापरली तरी आर्थिक शिस्त लागेल.
गुंतवणुकीत विविधता ठेवा
जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंड, सोने, रिअल इस्टेट, स्टॉक्स, बाँड्स, मुदत ठेवी अशा विविध पर्यायांचा विचार करा. एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवल्याने जोखीम वाढते. तुम्हाला गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती नसेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. गुंतवणुकीतील विविधतेचे फायदे तुम्हाला या लिंकवर वाचायला मिळतील.
दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा
गुंतवणूक ही काही शंभर मीटरची रेस नाही तर लांब पल्ल्याची मॅरेथॉन रेस आहे, असे समजा. कारण, अल्प कालावधीत अनेक चढउतार येऊ शकतात. त्यामुळे विचलित होऊ नका. शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करत राहिल्यास दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बाजार तात्पुरता वर खाली गेल्यास घाबरू नका.
अपडेटेड राहा
सरकारचे महत्त्वाचे आर्थिक निर्णय, मार्केट ट्रेंडचा सतत अभ्यास करा. अनुभवी आर्थिक सल्लागारांकडून माहिती घ्या. त्यामुळे गुंतवणूक करताना चुका टाळता येतील. बदलत्या परिस्थितीनुसार गुंतवणुकीचे निर्णय घ्या. आणि हो, अद्ययावत माहितीसाठी तुम्ही महामनीला फॉलो करा. येथे तुम्हाला गुंतवणूक आणि आर्थिक घडामोडींची सर्व माहिती मिळेल.
दीर्घकाळासाठी SIP चा पर्याय निवडा
SIP द्वारे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम विविध योजनांमध्ये गुंतवू शकता. अल्प कालावधीतील जोखीम टाळून तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावा मिळवू शकता. यातून जोखीमही कमी होते. त्यामुळे शिक्षण, घर, गाडी, निवृत्ती अशा मोठ्या उद्दिष्टांसाठी SIP फायदेशीर ठरू शकते.
गुंतवणूक प्लॅनमध्ये योग्य ते बदल करत जा
वर म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात जबाबदाऱ्या बदलतात. त्यामुळे तुमचे आर्थिक ध्येय देखील बदलतील. त्यानुसार तुमचे गुंतवणुकीची रणनीती देखील बदला. जोखीम क्षमतेनुसार निर्णय घ्या. निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत नसतो. त्यामुळे गुंतवणुकीत जास्त जोखीम घेऊ शकत नाही. तर तरुण वयात जोखीम घेण्याची क्षमता जास्त असू शकते. त्यानुसार कोठे गुंतवणूक करावी याचा निर्णय घ्या.
भावनिक निर्णय टाळा
आर्थिक निर्णय घेताना भावनांना आवर घालायला शिका. भीती किंवा हाव याने प्रभावित होऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. कोठेही गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचा सखोल अभ्यास करा. त्यानंतरच ठरवा. नातेवाईक, मित्र, बाजारातील ऐकीव माहितीवर आधारित कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला माहिती नसेल तर अधिकृत आर्थिक सल्लागाराची माहिती घ्या. योग्य आर्थिक सल्लागार कसा निवडाल हे या लिंकवर वाचा.