Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Portfolio: गुंतवणुकीत वैविध्य कसं राखाल; पोर्टफोलिओ तयार करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Investment Portfolio

अनेकजण जोखीम नको म्हणून सर्व पैसे बचत खाते, मुदत ठेवी किंवा सोन्यामध्ये गुंतवतात. तर काही अती जोखीम घेऊन फक्त स्टॉक्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, मीड कॅप, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. असे न करता तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असायला हवा. तसेच बाजारातील चढउतारानुसार त्यात बदलही करायला हवे. गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात, हे आपण या लेखात पाहू.

गुंतवणूक करताना कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. सर्व पैसे निश्चित परतावा देणाऱ्या योजना किंवा इक्विटी मार्केटमध्ये न गुंतवता दोन्हींचा समतोल साधला पाहिजे. एकाच योजनेत सगळी गुंतवणूक केली तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता जास्त असते. अनेकांना गुंतवणुकीत वैविध्य कसे ठेवावे हे समजत नाही. तुमच्या इनवेस्टमेंटचा पोर्टफोलिओ तयार करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात, हे आपण या लेखात पाहू.

अनेकजण जोखीम नको म्हणून सर्व पैसे बचत खाते, मुदत ठेवी किंवा सोन्यामध्ये गुंतवतात. तर काही अती जोखीम घेऊन फक्त स्टॉक्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, मीड कॅप, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. असे न करता तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण असायला हवा. तसेच बाजारातील चढउतारानुसार त्यात बदलही करायला हवे.

गुंतवणुकीचे पर्याय किती? (Investment options)

निश्चित परतावा देणाऱ्या योजना (Fixed Income Assest)

बाजारपेठेत चढउतार होत असतानाही या योजनांतून निश्चित परतावा मिळत राहतो. या योजनांमध्ये जोखीम कमी असते. मुदत ठेवींमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित व्याजदराने परतावा मिळेल. यातील गुंतवणूक अधिकृत आणि नामांकित वित्तसंस्थांमध्ये करायला हवी. अनेकजण थोड्या जास्त व्याजदराला भुलून अशा वित्तसंस्थांमध्ये गुंतवणूक करतात, जेथे मुद्दलही गमावून बसतात. मुदत ठेवींशिवाय पब्लिक प्रोविडंट फंड, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजनांसह इतरही निश्चित परतावा योजना आहेत. 

काही विमा योजना परिपक्वतेनंतर निश्चित परतावा देतात. बाँड्समधूनही (रोखे) निश्चित परतावा मिळतो. मात्र, उच्च क्रेडिट रेटिंग असलेल्या बाँड्समध्येच गुंतवणूक करायला हवी. 7 ते 11 टक्क्यांपर्यंत परतावा बाँडमधून मिळू शकतो. कमी क्रेडिट रेटिंग असलेल्या बाँडमध्ये जास्त जोखीम असते. सरकारी रोखेही निश्चित परतावा मिळण्याचा एक चांगला पर्याय आहे. बाजारात चढउतार असतानाही या योजनांतून निश्चित परतावा मिळतो. मात्र, व्याजदर तुलनेने कमी असतो.

इक्विटी गुंतवणूक (Investment in equity market)

इक्विटी पर्यायाद्वारे तुम्ही थेट एखाद्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. या अॅसेट क्लासमध्ये उच्च जोखीम आणि उच्च परतावा मिळू शकतो. परतावा कधीही निश्चित नसतो आणि बाजारातील चढ उतारानांनुसार बदल होत राहतात. लार्ज कॅप, मीड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक पर्यायांसोबत क्षेत्रिय (सेक्टोरल) स्टॉकमध्येही गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, बँकिंग, आयटी, हेल्थकेअर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. इक्विटी पर्यायाद्वारे तुम्ही परदेशी भांडवली बाजारातही गुंतवणूकही करू शकता.

स्थावर मालमत्ता (Investment in equity Market)

स्थावर मालमत्ता हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र, खरेदीसाठी तुम्हाला जास्त पैसे लागतात. जमीन किंवा फ्लॅट खरेदीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. विशेषत: मेट्रो शहरांमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच स्थावर मालमत्ता विक्री सहजरित्या होत नाही. योग्य खरेदीदार तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा मिळेलच असे नाही. तुम्हाला तोटाही होऊ शकतो. तुम्ही जर निश्चित परतावा योजना आणि इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार करू शकता. मात्र, तुमच्यावर इतर कर्जाचा बोजा नसावा.

तुम्ही रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्टमध्येही (REIT)  गुंतवणूक करू शकता. हे ट्रस्ट म्युच्युअल फंडसारखे काम करते. गुंतवणुकदारांकडून जमा झालेला पैसे ट्रस्टद्वारे रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. यावर तुम्हाला लाभांश मिळतो. स्वत: मालमत्ता खरेदी करून देखभाल, दुरुस्ती खर्च करण्यापेक्षा REIT पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. Embassy park REIT आणि माइंड स्पेस सारखे REIT पर्याय उपलब्ध आहेत. या ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैशांची गरज नाही. अगदी हजार पाचशेपासूनही गुंतवणूक करू शकता.

सोन्यातील गुंतवणूक (Investment In Gold)

भारतीय नागरिक पूर्वीपासून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. भारतीय संस्कृतीत सूवर्ण धातूला अती महत्त्व आहे. सुवर्ण गुंतवणुकीत अती तरलता (लिक्विडिटी) आहे. जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा तुम्ही सोने विकू शकता किंवा तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. मात्र, सोन्यातील गुंतवणुकीतून जेमतेम परतावा मिळतो. 7 ते 8 टक्क्यांपर्यंत परतावा सरासरी मिळू शकतो. तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 5 ते 10 टक्के रक्कम सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

दुकानात जाऊन सोने घेण्यापेक्षा इतर पर्यायांचा विचार करू शकता. डिजिटल गोल्ड, सोवरिन गोल्ड बाँड्स, गोल्ड इटीएफ, गोल्ड म्युच्युअल फंड हे पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध असतात. सार्वभौम सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. हे रोखे सरकारच्या हमीवर आरबीआयद्वारे जारी केले जातात. यातून तुम्हाला सहा महिन्यांतून अडीच टक्के दराने व्याजही मिळते. तसेच योजना परिपक्व झाल्यानंतर सोन्याचे जे दर असतील त्यानुसार पैसे मिळतील. अतिरीक्त शुल्कही लागत नाही.  

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ कसा तयार कराल? ( How to diversify investment)

सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गुंतवणूक करताना सर्वांसाठी कोणताही एक पर्याय कधीच योग्य नसतो. तुमचा मित्र, किंवा नातेवाईक एखाद्या शेअर्स किंवा योजनेत गुंतवणूक करत असेल तर तुम्हीही त्यात गुंतवणूक करावी हे आवश्यक नाही. 

गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत:ला दोन प्रश्न विचारा

माझे आर्थिक ध्येय काय आहे? आणि जोखीम घेण्याची क्षमता किती? हे दोन प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा. मग तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा याची स्पष्टता येईल. भविष्यात घर घेण्याचा निर्णय, मुलांचे शिक्षण, उद्योग सुरू करणे, गाडी खरेदी, निवृत्तीनंतरचे नियोजन, पर्यटन असे अनेक ध्येय असू शकतात. दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे वेगवेगळे ध्येयही असू शकतात. दीर्घकाळ म्हणजेच 5 वर्षांपेक्षा जास्त काळातील आर्थिक ध्येय.

तुमच्या आर्थिक ध्येयानुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडा. जर तुमचे अल्पकालीन ध्येय असेल किंवा आणीबाणीसाठी पुढील 2 ते 3 वर्षात पैशांची गरज पडणार असेल तर इक्विटी मार्केटमधील गुंतवणूक योग्य ठरणार नाही. अल्पकालीन ध्येयासाठी निश्चित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. मात्र, जर तुमचे दीर्घकालीन ध्येय असेल त्यावेळी तुम्ही शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक योग्य राहू शकते. इक्विटी मार्केटमध्ये सतत चढउतार होत असतात. वर्षभरात गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्क्यांनीही खाली येऊ शकते. मात्र, दीर्घकाळात इक्विटी मार्केटमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.  

जोखीम क्षमता किती? (How to assess risk taking capacity)

प्रत्येकाची जोखीम घेण्याची क्षमता सारखी नसते. जर तुमचे वय कमी असेल तर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये थोडी जास्त जोखीम घेऊ शकता. मात्र, वाढत्या वयाबरोबरच तसेच निवृत्तीनंतर तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन करत असाल तर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत नाहीत. कारण, त्या वयात तुम्ही पैसे कमवू शकत नाहीत. जी आयुष्यभराची पुंजी तुमच्याकडे साठली आहे त्यातून तुम्हाला उरलेले आयुष्य काढायचे असते. तेव्हा जोखीम घेतील आणि नुकसान झाले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. वयाच्या तिशीमध्ये असणाऱ्या व्यक्तीची आर्थिक ध्येय अनेक असू शकतात. जसे की, मुलांचे शिक्षण, घर, गाडी, व्यवसाय.

पोर्टफोलिओची पुनर्रचना कशी कराल? (How to rebalance Investment Portfolio)

इक्विटी आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये 50:50 गुंतवणूक करू शकता. तसेच बाजारातील चढउतारानुसार गुंतवणुकीत बदल करावे. उदाहरणार्थ, जेव्हा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणे महाग होते तेव्हा स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक फक्त 25% पर्यंत ठेवून निश्चित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये 75% पर्यंत केलेली गुंतवणूक योग्य ठरू शकते. मात्र, तेव्हा बाजार कोसळला असेल, कमी किंमतीमध्ये शेअर्स मिळत असतील तेव्हा 75% पर्यंत रक्कम स्टॉक्समध्ये आणि 25% पर्यंत रक्कम निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांत गुंतवावी.

गुंतवणूक करताना भाववाढ, व्याजदर, इंधन दरवाढ, कॉर्पोरेट कंपन्यांचा नफा, हवामान, सरकारी धोरणे इ घटकांकडेही लक्ष द्यायला हवे. अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे याचा अंदाज घ्यावा. यातून पुढील काळात अर्थव्यवस्था कशी असेल हे समजू शकते. त्यानुसार गुंतवणूक पोर्टफोलिओत बदल करून तुम्ही चार पावले पुढे रहाल.