Financial Advisor: योग्य सल्ला तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो. तुमची भरभराट करतो. तर एक चुकीचा सल्ला देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतो. जीवनात एव्हाना असे अनेक अनुभव तुम्हाला आलेच असतील. जेव्हा प्रश्न पैशांचा येतो, गुंतवणुकीचा येतो तेव्हा तर प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवा. कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा ऐकीव माहितीवर कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका.
या लेखात पाहूया आर्थिक सल्लागाराची निवड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. गुंतवणूक, विमा, रिअल इस्टेट खरेदी-विक्री, म्युच्युअल फंड, शेअर्सचे व्यवहार हे अनेकांसाठी अत्यंत क्लिष्ट विषय आहेत. सर्वसामान्य नागरिकांना यातील काहीही समजत नाही. निवृत्तीनंतर एकरकमी पैसे जवळ आल्यावर तर आर्थिक सल्लागाराची खूप गरज भासते.
तुमच्या आर्थिक गरजांना पूर्ण करणाऱ्या योग्य सल्लागाराची निवड करताना खालील टिप्स फॉलो करा.
तुम्हाला नक्की काय हवंय?
तुम्हाला कोणते आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत. भविष्यातील मोठे खर्च कोणते? गरजा आणि जबाबदाऱ्या कोणत्या याचा आढावा घ्या. त्यानुसार सेवा पुरवणाऱ्या आर्थिक सल्लागाराचा शोध घ्या. तुम्हाला नक्की कशासाठी मदत हवी आहे, तो सल्लागार मदत करू शकतो का? हे पाहा.
ऑनलाइन की ऑफलाइन
सध्या ऑनलाइन आर्थिक सल्ला देणारे सल्लागारही भेटतात. मात्र, भेटून ज्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून घेता येते, ते कदाचित मिळणार नाही. अनेकांना भेटून महत्त्वाचे निर्णय घेण्यावर विश्वास असतो. समक्ष भेटून तुम्ही तुमच्या गरजा नीट सांगू शकता. तुम्हाला कोणती गोष्ट सोईस्कर वाटते त्यानुसार ठरवा.
सल्लागाराची शैक्षणिक पात्रता
आर्थिक सल्लागाराला सर्व फायनान्शिअल योजनांची इत्थंभूत माहिती असावी. CFP, QPFP अशा परीक्षा उत्तीर्ण झालेला सल्लागार असेल तर अती उत्तम. या परीक्षांमध्ये त्यांना नैतिकतेची शपथ देखील दिली जाते. गुंतवणुकीचा सल्ला देणारा व्यक्ती नक्कीच ही सर्व कौशल्य असणारा असावा. त्याची आधी माहिती घ्या.
कामाचा अनुभव किती?
दीर्घ कामाचा अनुभव, अद्ययावत माहिती असलेल्या आर्थिक सल्लागाराची निवड करा. अनेक प्रकारच्या समस्या हाताळण्याचे कौशल्य असेल तर तुमची जोखीम करण्यासाठी योग्य वेळी सल्ला मिळेल. नवख्या व्यक्तीला हे समजण्याची शक्यता कमी. जमलेच तर त्या सल्लागाराचे ऑनलाइन रिव्ह्यू(अभिप्राय) वाचा. थोडक्यात काय तर अनुभवाला प्राधान्य द्या.
तुमची गरज काय?
जर तुम्हाला म्युच्युअल फंड, कर, शेअर मार्केट, विमा गुंतवणूक योजनांबद्दल सल्ला हवा असेल. मात्र, आर्थिक सल्लागाराला या क्षेत्रातील कमी माहिती असेल आणि कुठल्या क्षेत्रातील गुंतवणुकीचा जास्त अनुभव असेल तर असा सल्लागार तुमच्या कामाचा ठरणार नाही. त्यामुळे तुमची गरज ओळखा.
एकापेक्षा जास्त सल्लागारांना भेटा
एकाच आर्थिक सल्लागाराशी बोलून निवड करू नका. कमीकमी तीन सल्लागारांशी भेटून बोला. त्यातील जी व्यक्ती योग्य वाटेल तिची निवड करू शकता. जो व्यक्ती तुम्हाला जास्त विश्वासार्ह वाटेल, चर्चा करताना सहजता जाणवले अशा व्यक्तीची निवड करा.
शुल्काबाबत स्पष्टता
एकापेक्षा जास्त व्यक्तींशी बोलल्यास तुम्हाला शुल्काबाबत स्पष्टता येईल. तुलना करता येईल. तसेच आधीच किती शुल्क आकारले जाईल यावर एकमत असू द्या. अन्यथा नंतर विवाद होऊ शकतात. पारदर्शकपणे व्यवहार करण्यासाठी हे गरजेचे आहे.