SIP Investment: गुंतवणूक करताना चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांकडून दिला जातो. चक्रवाढ व्याजदाराने तुम्ही 10 कोटी रुपये 60 वर्षांचे होईपर्यंत जमा करू शकता का? तर नक्कीच करू शकता. मात्र, त्यासाठी लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा मंत्र ध्यानात ठेवावा लागेल.
जर तुम्हाला 10 कोटींचा फंड 60 वर्षांचे होईपर्यंत उभा करायचा असल्यास 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी दरमहा 15 हजार रुपयांची SIP ( systematic investment plan) सुरू करावी लागेल. परताव्याचा दर 12 टक्के गृहित धरून 60 वर्षाचे होईपर्यंत तुम्ही 10 कोटी रुपये उभारू शकता. मागील दहा वर्षात लार्ज कॅप फंडांनी सरासरी 13 टक्के परतावा दिल्याचे आकडेवारीतून दिसते. त्यामुळे तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त व्याजदरही मिळू शकतो.
30 वर्षी गुंतवणूक सुरू केली तर किती SIP करावी लागेल?
जर तुम्ही 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर 28 हजार रुपये प्रति महिना एसआयपी सुरू करावी लागेल. (SIP Investment ) तेव्हा 12 टक्के व्याजदराने 60 वर्षांचे होईपर्यंत 10 कोटी रुपये जमा होतील. जर आणखी उशीरा म्हणजे 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला 1 लाख रुपये प्रति महिना एसआयपी करावी लागेल. दरमहा 1 लाख गुंतवणूक करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे जेवढे लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढे तुमच्यासाठी सोपे होईल.
चक्रवाढ व्याज कसे काम करते?
जर तुम्ही 30 हजार रुपये प्रति महिना SIP मध्ये गुंतवत असाल. 12 टक्के व्याजदर गृहित धरू. पहिल्या आठ वर्षात 50 लाख रुपये निधी जमा होईल. तेथून पुढे फक्त 4 वर्षात आणखी 50 लाख रुपये जमा होतील. तर त्यापुढे 3 वर्षात 50 लाख आणखी रक्कम फंडात जमा होईल. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करत असताना पैशांची वाढ वेगाने होते. 20 वर्ष सलग शिस्तीने गुंतवणूक केल्यानंतर प्रति वर्षी 50 लाख रुपये निधीत जमा होतील. एसआयपीचे मूल्य वाढल्यास परतावाही तेवढाच जास्त मिळतो.
पोर्टफोलिओ लवकर मोठा कसा कराल?
प्रत्येकजण आपल्या उत्पन्न, खर्च, कर्जाचा बोजा, गरजा पाहून गुंतवणूक करत असतो. दरम्यान, तुमच्या उत्पन्नातून कर वजा केल्यानंतर 15 ते 25 टक्के रक्कम योग्य पर्यायांत गुंतवल्यास निवृत्तीनंतरची चिंता मिटू शकते. वाढत्या उत्पन्नानंतर SIP दरवर्षी टॉप-अप करूनही तुम्ही मोठा फंड उभारू शकता.