गेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. कित्येक गुंतवणूकदारांना याचा लाभ झाला आहे. CL Educate Share ने चांगला परतावा (रिटर्न्स) दिला आहे. आता ही कंपनी एका शेअरवर एक शेअर बोनस देणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.
सीएल एड्युकेटने स्टॉक एक्सचेंजला याविषयीचे निवेदन दिले आहे. कंपनीच्या बोर्डाने 5 रुपये दर्शनी मूल्याच्या एका शेअरसाठी 1 बोनस शेअर देण्यात येणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने 16 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट यासाठी निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की, 16 डिसेंबर रोजी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांनाच बोनस शेअर्स दिले जातील.
बोनस शेअर्स हे अतिरिक्त दिलेले शेअर्स असतात. आपल्या विद्यमान शेअर धारकांना कंपनी त्यांच्या मालकीच्या प्रमाणात देते. याचा गुंतवणूकदारांना लाभ होत असतो. CL Educate Share ने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. पोझिशनल गुंतवणूकदारांना यावर्षी कंपनीने 40 टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) कंपनीच्या शेअर्सना 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. सीएल एड्युकेटच्या शेअरची किंमत 169.10 रुपयांवर पोहोचली. मात्र नंतर कंपनीचे शेअर्स थोडे घसरले. बंद होताना बीएसईवर 164.90 रुपये इतकी किमत होती.
अप्पर सर्किट का लावले जाते?
एखाद्या शेअरचा भाव खूप वाढत असेल किंवा अन्य काही कारणांमुळे संबंधित कंपनीत गुंतवणूक करण्याचा ओढा वाढू लागला तर अशा वेळी त्या शेअरचे भाव खूप वाढू लागतात. अशा वेळी बऱ्याचदा मार्केटमधील मोठे इन्व्हेस्टर लाखो-करोडोच्या संख्येने त्या शेअरची खरेदी करतात. त्यामुळे भावांत मोठी वाढ होऊ लागते. ही कृत्रिम किंवा अनैसर्गिक तेजी मानली जाते. कालांतराने छोट्या किंवा किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळेच त्याला लगाम लावण्यासाठी अप्पर सर्किट लावले जाते.
बुधवारी 1.79 टक्क्यांची घसरण
CL Educate Share ने गेल्या 6 महिन्यात चांगला परतावा (रिटर्न) दिला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 25 टक्क्याहून अधिक वाढले आहेत. गेल्या महिन्याभरातही कंपनीने 10 टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे. CL educate Share ने बुधवारी 1.79 टक्क्यांची घसरण नोंदवली. बुधवारी बाजार बंद होताना 162.10 रुपये इतके दर होता. मंगळवरच्या तुलनेत यात 2.95 रुपये इतकी घट झाली.