Sankarshan Chanda : जेव्हा शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांचा उल्लेख येतो, तेव्हा दिवंगत राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमानी, विजय केडिया, आशिष कोचलिया, डॉली खन्ना यांच्यासारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची नावे डोळ्यापूढे येतात. आजपासून 15 ते 20 वर्षांपूर्वीचा विचार केल्यास शेअर बाजार म्हणजे काय? त्यात पैसे कसे गुंतवतात? हे केवळ मोजक्या लोकांनाच माहिती होते. मात्र, आता तरुण पिढी देखील शेअर मार्केटमध्ये पैसा लावून जोरदार कमाई करत आहेत. मूळचा हैदराबाद येथील संकर्ष चंदा याने वयाच्या 17 व्या वर्षापासून ट्रेडिंग सुरू करून आज कोट्यवधी रुपये जमवले आहे. त्यामुळे लोक त्याला शेअर मार्केटचा नवा बिगबुल म्हणून ओळखू लागले आहेत.
2000 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात
संकर्ष चंदा हा 2016 मध्ये ग्रेटर नोएडाच्या बेनेट विद्यापीठ येथून बी टेक कॉम्प्यूटर सायन्सचे शिक्षण घेत असताना त्याला स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्याने अर्थशास्त्राचा अभ्यास करून, भांडवली बाजार अतिशय काळजीपूर्वक समजून घ्यायला सुरुवात केली. 2017 मध्ये 2,000 रुपये गुंतवणूक करणाऱ्या संकर्षने दोन वर्षात दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली. आणि या दीड लाखांचे पुढील दोन वर्षांत 13 लाख रुपये झाले. यामधून संकर्षचा आत्मविश्वास वाढत गेला आणि आज तो केवळ 24 वर्षांचा असताना त्याची संपत्ती कोट्यवधीत आहे.
100 कोटीचा मालक
केवळ एवढेच करून संकर्ष थांबला नाही, तर त्याने 8 लाख रुपयांचे शेअर्स विकून स्वत:ची सावर्त नावाची फिनटेक स्टार्टअप कंपनी सुरू केली. ही कंपनी लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते. पैसे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी कसे गुंतवायचे हे संकर्षला माहिती होते. त्यामुळे आज तो 24 वर्षाचा असताना त्याची एकूण संपत्ती आता 100 कोटींवर पोहचली आहे.