• 04 Oct, 2022 16:38

सरकार आमच्यासोबत PUBG गेम खेळतंय; सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ला तरूणांचा विरोध

Agnipath scheme bihar protest

संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दि. 14 जून रोजी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेद्वारे सरकार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडत असल्याची भावना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांकडून आणि त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. भारतातील तरुणांना चार वर्षांसाठी भारतीय सैन्यात भरती (Agneepath Recruitment Scheme 2022) होऊन देशसेवा करता येणार आहे. या नवीन सैन्य भरती नियमाला सरकारने ‘अग्निपथ’ योजना (Agneepath Scheme Indian Army) म्हटले असून या योजनेद्वारे सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाणार आहे. पण सैन्य भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या या नवीन नियमांना सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणांकडून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यातील तरूण मोठ्या संख्येने ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. ‘अग्निपथ’ योजनेद्वारे सरकार आमच्यासोबत PUBG गेम खेळत असल्याचा आरोप सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांकडून केला जात आहे. या तरूणांच्या पालकांनीही या योजनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.


देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना सरकारकडून सन्मानाच्या वागणुकीबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक गरज भागविणे अपेक्षित असताना, सरकार या तरूणांच्या भविष्याशी खेळत आहे. या 4 वर्षांच्या कालावधीत देशसेवा करताना अग्निवीरांना बलिदान प्राप्त झालं तर विम्याची आणि कुटुंबाला 1 कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या अशा नियमांविरोधात सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (दि.14 जून) ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. ‘अग्निपथ’ योजने अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या 4 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेल्या तरूणांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन (Agneepath Scheme Salary) आणि सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच ‘अग्निपथ’ योजनेत भरती होणाऱ्या या तरूणांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाणार आहे.

‘अग्निपथ’ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या तरूणांना 4 वर्षानंतर निवृत्त केले जाणार आहे आणि यातील फक्त 25 टक्के तरूणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. तसेच पहिल्या वर्षासाठी या अग्निवीरांना प्रत्येक महिन्याला 30 हजार रूपये तर शेवटच्या म्हणजे चौथ्या वर्षी 40 हजार रूपये मानधन  दिले जाणार आहे. पण हे मानधन पूर्णपणे मिळणार नाही. पहिल्यावर्षी 30 हजारांमधील 9 हजार रूपये कापून घेतले जाणार असून अग्निवीरांच्या हातात केवळ 21 हजार रूपये मिळणार आहेत. तर शेवटच्या म्हणजे चौथ्या वर्षी 40 हजार रूपयांमधून 12 हजार रूपये कापले जाणार आहेत आणि अग्निवीरांच्या हातात फक्त 28 हजार रूपये पडणार आहेत. याबाबत संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, या 4 वर्षात अग्निवीरांच्या मानधनातून 5.02 लाख रूपये कापले जाणार आहेत; आणि तेवढीच रक्कम सरकारद्वारे दिली जाणार आहे. म्हणजे हे 'अग्निवीर' 4 वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर त्यांना 11.71 लाख रूपये सेवा निधी म्हणून दिला जाणार आहे.

image source - https://bit.ly/3OcOzS4