केंद्र सरकारने मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या 'एनपीएस वात्सल्य' योजनेत आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पेन्शन नियामक संस्था 'पीएफआरडीए'ने या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या बदलांमुळे ही योजना आता पालकांसाठी अधिक लवचिक आणि फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः मुलांचे शिक्षण आणि गंभीर आजारांच्या उपचारांसाठी निधीची गरज भासल्यास आता गुंतवणुकीतून पैसे काढणे सोपे होणार आहे.
पैसे काढण्याचे नवीन नियम
एनपीएस वात्सल्य खाते उघडल्यानंतर 3 वर्षांनी गुंतवणूकदारांना आंशिक पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खालील कारणांसाठी तुम्ही तुमच्या योगदानाचा 25 टक्क्यांपर्यंत हिस्सा काढू शकता:
- पाल्याचे उच्च शिक्षण.
- गंभीर वैद्यकीय उपचार.
- विशेष अपंगत्व आल्यास लागणारा खर्च.
हे पैसे मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी दोनदा आणि 18 ते 21 वर्षांच्या दरम्यान दोनदा काढता येतील. आतापर्यंत संपूर्ण गुंतवणूक काळात केवळ 3 वेळाच पैसे काढण्याची मुभा होती.
गुंतवणुकीवर मिळणार चांगला परतावा
आता या योजनेत गुंतवलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त 75 टक्के हिस्सा इक्विटी म्हणजे शेअर बाजारात गुंतवता येणार आहे. यामुळे दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढली आहे. पारंपारिक योजनांच्या तुलनेत यामुळे मुलांच्या भविष्यासाठी मोठा निधी जमा करणे सोपे होईल.
18 वर्ष पूर्ण झाल्यावर काय?
मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्याकडे खालील पर्याय उपलब्ध असतील:
- संपूर्ण निधी एनपीएस टियर-1 खात्यात वर्ग करणे.
- एकूण जमा रकमेपैकी 80 टक्के रक्कम एकरकमी काढणे आणि उर्वरित 20 टक्क्यांतून पेन्शनसाठी योजना खरेदी करणे.
जर खात्यात जमा असलेली एकूण रक्कम 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एनपीएस वात्सल्य ही एक सरकारी पेन्शन योजना असून ती अल्पवयीन मुलांसाठी डिझाइन केलेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ही योजना अधिकृतपणे लाँच करण्यात आली होती.