Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO : Tata Group चा ‘हा’ IPO मार्केट गाजवणार का? जाणून घ्या सर्व डिटेल्स

New IPO

Image Source : www.financetalk.in

Scam 1992 : ‘’ उठालो कोई भी टाटा का शेअर, जादा सोचो मत पुरानी कंपनी है , आज नही तो कल फायदाही होगा '', सीरीजमधल्या हर्षद मेहताचा हा डायलॉग आठवतोय का? शेअर मार्केटमध्ये आत्ता अस काय विशेष घडतय, की ज्यामुळे हा डायलॉग आठवावा ?

शेअर बाजारात सक्रिय असणाऱ्या बऱ्याच गुंतवणूकदारांचे IPO वर विशेष लक्ष असते. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल.  टाटा समूह आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक म्हणून  टाटा समूह ओळखला जातो. साहजिकच या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे  19  वर्षांनंतर टाटा समूह आयपीओ आणत आहे. 

टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज या आयपीओद्वारे 3 हजार 500  ते 4 हजार कोटी रुपये उभे केले जाऊ  शकतात. या आयपीओसाठी कंपनीचे मूल्यांकन 16 हजार 200 ते 20 हजार  कोटी रुपयांपर्यंत असू शकते. टाटा समूहाकडून  या आयपीओसाठी काम सुरू झाले  आहे. याबाबत मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी दोन सल्लागारांसोबत काम करत आहे. यासोबतच आणखी एक सल्लागार नेमण्याची प्रक्रिया  देखील  सुरू आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने टाटा टेक्नॉलॉजीजमधील काही भागभांडवल आयपीओद्वारे विकण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मात्र,  टाटा समूहाने अद्याप या आयपीओसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. योग्य संधीची वाट पाहत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील टाटा समूहाचा हा पहिला  आयपीओ असणार आहे.  टाटा टेक्नॉलॉजीज ही डिजिटल, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. यामध्ये टाटा मोटर्सचा 74.42 टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे 8.96 टक्के इतका हिस्सा अल्फा टीसीकडे आणि 4.48  टक्के टाटा कॅपिटल ग्रोथ फंडकडे आहे.

2004 मध्ये आला होता हा ‘टाटा’ चा  हा  IPO 

यापूर्वी टाटा समूहाच्या कोणत्याही कंपनीचा आयपीओ बऱ्याच वर्षात आलेला नाही. यापूर्वी  19 वर्षांपूर्वी आला होता. टाटा समूहाने 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) आयपीओ आणला होता. टीसीएस ही आज देशातील दुसरी सर्वात मूल्य असणारी कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे 16 लाख 71 हजार 800.07 कोटी रुपयांचे मार्केट कॅप आहे. तर टीसीएस 12 लाख 33 हजार 82.02 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

टाटा समूहाने यापूर्वीही IPO आणण्याचा केला होता प्रयत्न 

टाटा समूहाची व्याप्ती मोठी आहे.  आतापर्यंत या समूहाचे  एकूण 29 उद्योग आहेत. ते बाजारात सूचीबद्ध आहेत. टाटा समूहाच्या कंपनीचे बाजार मूल्य 314 अब्ज (23.4 ट्रिलियन) डाॅलर इतके आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांनी 2017 मध्ये कार्यभार हाती घेतला.  त्यांनी  पदभार हाती घेतल्यानंतर हा कंपनीचा पहिला आयपीओ असेल. यापूर्वी कंपनीने Autocomp Systems चा आयपीओ लाँच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर आयपीओची योजना रद्द झाली होती. 

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)